Asia Cup IND vs SL Final 2023 | टीम इंडिया-श्रीलंका 13 वर्षानंतर पुन्हा समोरासमोर, कोण जिंकणार?
India vs Sri Lanka Asia Cup 2023 | श्रीलंका टीम इंडिया विरुद्ध 13 वर्षांपूर्वीचा वचपा घेण्यासाठी सज्ज आहे. मात्र टीम इंडियाही रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आशिया किंग होण्यासाठी तयार आहे. त्यामुळे सामना हा बरोबरीचा आहे.
कोलंबो | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया आणि दासुन शनाका याच्या कॅप्टन्सीत श्रीलंका आशिया कप 2023 फायनलमध्ये एकमेकांचा आमनासामना करणार आहेत. हा सामना रविवारी 17 सप्टेंबरला होणार आहे. टीम इंडिया आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी उचलण्यासाठी सज्ज आहे. तर श्रीलंका टीम आपल्या घरात सातव्यांदा आशिया किंग होण्यासाठी तयार आहे. श्रीलंका टीमने गेल्या वर्षी टी 20 फॉर्मेटमधील आशिया कप जिंकला होता. त्यामुळे आता श्रीलंकेवर आपल्या घरच्या मैदानावर आशिया कप ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान असणार आहे.
श्रीलंकेने पाकिस्तानवर अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या बॉलवर विजय मिळवत अंतिम फेरीत एन्ट्री केली. तर टीम इंडियाने याच श्रीलंकेचा बाजा वाजवत फायनलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियाची बॅटिंग साईड आणि श्रीलंकेची बॉलिंग साईड ही मजबूत आहे. सुपर 4 मधील सामन्यात दुनिथ वेल्लालागे या युवा गोलंदाजाने टीम इंडियाच्या 5 विकेट्स घेत पंचनामा केला होता. मात्र कुलदीप यादव याने श्रीलंकेला फिरकीच्या जोरावर पराभूत केलं. त्यामुळे उभयसंघात अंतिम सामना रंगतदार होणार हे निश्चित आहे.
13 वर्षांनी आमनेसामने
टीम इंडिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी सुपर 4 मधील प्रत्येकी 1 सामना गमावलाय. टीम इंडियाचा आशिया कप 2023 मधील विजयरथ बांगलादेशने सुपर 4 मधील अखेरच्या सामन्यात रोखला. तर टीम इंडियानेच सुपर 4 मध्ये श्रीलंकेला पराभूत केलंय. त्यामुळे श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया वरचढ आहे. मात्र श्रीलंकेला होम एडव्हान्टेज आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं. दरम्यान टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आशिया कप फायनलमध्ये 2010 नंतर पहिल्यांदा भिडणार आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात कोण बाजी मारतं, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.
श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, मथीशा पथिराना, सदीरा समरविक्रमा, महीश थेक्षाना, डुनिथ वेललागे, कासुन राजिथा, दुशान हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.