IND vs SL Final | टीम इंडिया आशिया ‘किंग’, श्रीलंकेवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय

| Updated on: Sep 17, 2023 | 6:38 PM

Team India Win Asia Cup 2023 | मोहम्मद सिराज याच्या धमाकेदार बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियाने आशिया कप जिंकला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेचा अंतिम सामन्यात 10 विकेट्सने धुव्वा उडवलाय.

IND vs SL Final | टीम इंडिया आशिया किंग, श्रीलंकेवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय
Follow us on

कोलंबो | टीम इंडियाने 2018 नंतर पुन्हा एकदा रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. टीम इंडियाने चेंडूंच्या हिशोबाने सर्वात मोठा विजय मिळवला आहे. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या 51 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान टीम इंडियाच्या शुबमन गिल आणि ईशान किशन या सलामी जोडीने 6.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. शुबमन गिल याने नाबाद 27 आणि ईशान किशन याने नाबाद 23 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाची आशिया कप जिंकण्याची ही आठवी वेळ ठरली आहे.

टीम इंडियाची बॉलिंग

त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर लंकेने सुरुवातीपासूनच शरणागती पत्कारली. लंकेच्या फलंदाजांना खातं उघडता आलं नाही. तर चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. विकेटकीपर बॅट्समन कुसल मेंडीस याने सर्वाधिक 17 धावा केल्या. तर दुशन हेमंथा याने नाबाद 13 धावांचं योगदान दिलं. विशेष बाब म्हणजे टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनीच दहाच्या दहा विकेट्स घेतल्या.

टीम इंडिया आशिया किंग

जसप्रीत बुमराह याने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवून देत जोरदार सुरुवात केली. त्यानंतर मोहम्मद सिराज याने श्रीलंकेचा बाजर उठवला. सिराजने एकाच ओव्हमध्ये श्रीलंकेला 4 झटके दिले. तर हार्दिक पंड्या यानेही सिराज आणि बुमराहला चांगली साथ दिली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. सिराजची वनडे करिअरमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या याने 3 विकेट्स घेतल्या. तर बुमराहने 1 विकेट घेतली.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली. केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

आशिया कप फायनलसाठी श्रीलंकेचे 11 शिलेदार | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन आणि मथीशा पाथिराना.