Ranji Trophy सामन्यात 165 धावा, हनुमा विहारीने टीम इंडियासमोरील सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर दिलं
हैदराबादने (Hyderabad) रणजी करंडक स्पर्धेच्या (Ranji Trophy) नव्या मोसमाची धडाक्यात सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्या सामन्यात हैदराबादने चंदीगड संघाचा 217 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
मुंबई : हैदराबादने (Hyderabad) रणजी करंडक स्पर्धेच्या (Ranji Trophy) नव्या मोसमाची धडाक्यात सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्या सामन्यात हैदराबादने चंदीगड संघाचा 217 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. हैदराबादच्या या मोठ्या विजयानंतर टीम इंडियाला (Team India) त्याच्या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तरही मिळालं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल? हा टीम इंडियासमोरचा प्रश्न आहे. चेतेश्वर पुजारा अनेकदा कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळत असे. पण, निवड समितीने पुजाराला श्रीलंकेविरुद्धच्या निवडलेल्या कसोटी संघात स्थान दिलेले नाही. पण, रणजी ट्रॉफीत हैदराबादच्या पहिल्या विजयाने टीम इंडियाला या प्रश्नाचंही उत्तर मिळालं आहे.
हैदराबादच्या विजयासह, हनुमा विहारी टीम इंडियाचे उत्तर म्हणून समोर आला आहे, ज्याने चंदीगडविरुद्ध पहिल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 165 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्याने 59 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात 106 धावा करत त्याने शानदार शतक झळकावलं.
हैदराबादचा 217 धावांनी मोठा विजय
रणजी ट्रॉफी 2021-22 च्या पहिल्या सामन्यात हैदराबादने चंदीगडसमोर विजयासाठी 401 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात चंदीगडचा दुसरा डाव अवघ्या 183 धावांत आटोपला. त्यामुळे हा संघ लक्ष्यापासून 217 धावा दूर राहिला. हैदराबादसाठी दुसऱ्या डावात गोलंदाज रवी तेजाने 6 बळी घेतले. त्यांच्याशिवाय रक्शनने 3 आणि त्यागराजनने 1 बळी घेतला.
तिसऱ्या क्रमांकावर हनुमा विहारीची दमदार कामगिरी
याआधी हैदराबादने पहिल्या डावात 347 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये हनुमा विहारीचे योगदान 59 धावांचे होते, ज्यात त्याने 8 चौकारांच्या मदतीने 134 चेंडूत केल्या होत्या. प्रत्युत्तरात चंदीगडचा पहिला डाव 216 धावांत आटोपला. आणि पहिल्या डावात हैदराबादला 131 धावांची आघाडी मिळाली.
पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर हैदराबादने दुसरा डाव 8 बाद 269 धावांवर घोषित केला. हैदराबादकडून दुसऱ्या डावात हनुमा विहारीने शतक झळकावले. यावेळी त्याने 149 चेंडूत 106 धावा केल्या. त्याच्या या अप्रतिम शतकामुळे हैदराबादने चंदीगडसमोर 401 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ते पार करण्यात चंदीगडचा संघ अपयशी ठरला.
हनुमा विहारीने चंदीगडविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दोन्ही डावात धावा केल्या. त्याने दोन्ही डावात एकूण 165 धावा जोडल्या. या धावसंख्येसह त्याने पुजाराच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियासमोरील तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्नही संपुष्टात आणला आहे.
इतर बातम्या
Shikhar Dhawan: शेवटी बापच तो! घटस्फोटानंतर दोन वर्षांनी मुलाला भेटताच शिखर झाला भावूक
मुंबई-महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूंवर अन्याय? दिलीप वेंगसरकर BCCI च्या निवड समितीवर भडकले
IND vs SL Series: भारताच्या कसोटी संघात निवड, कोण आहे सौरभ कुमार?