Hardik Pandya: गंभीरमुळे हार्दिक पंड्याची कर्णधारपदाची संधी हुकली? सोशल मीडियावर चर्चा
Hardik Pandya Gautam Gmabhir: रोहित शर्माने वर्ल्ड कप विजयानंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे रोहितच्या जागेसाठी हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांची नावं आघाडीवर होती. अखेर सूर्याला कर्णधार करण्यात आलं आहे.
बीसीसीआय निवड समितीने अखेर श्रीलंका दौऱ्यााठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात 3-3 असे टी20 आणि वनडे सामने खेळणार आहे. रोहित शर्मा याच्या टी20i निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव याला कर्णधार करण्यात आलं आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीत ऑलराउंडर हार्दिक पंड्याही प्रबळ दावेदार होता. हार्दिकने गेली काही महिने रोहित-विराटच्या अनुपस्थितीत टी20i टीमचं नेतृत्व केलं. मात्र त्यानंतरही निवड समितीने हार्दिकऐवजी सूर्यकुमारवर विश्वास दाखवत त्याला कर्णधारपदाची सूत्रं दिली. त्यामुळे हार्दिकवर अन्याय झाल्याचा सूर नेटकऱ्यांना सोशल मीडियावर आळवला आहे.
हार्दिक राजकारणाचा शिकार?
राहुल द्रविड यांच्यानंतर गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच असणार आहे. श्रीलंका दौऱ्यातून गंभीर आपल्या नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. गंभीर आणि सूर्यकुमार हे दोघे आयपीएलमध्ये केकेआरसाठी एकत्र खेळले आहेत. गंभीरने सूर्याला सुरुवातीच्या काळात मार्गदर्शन केलंय. त्यामुळे दोघांची गट्टी आहे. त्यामुळेच की काय गंभीरने हस्तक्षेप करत कर्णधारपदासाठी हार्दिकऐवजी सूर्याचं नाव पुढे केलं का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी 20 वर्ल्ड कप 2022 सेमी फायनलमधील पराभवानंतर या फॉर्मेटपासून फारकत घेतली होती. त्यानंतर या दोघांनी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या काही महिन्यांआधी कमबॅक केलं. या दरम्यानच्या काळात हार्दिकने टी 20 टीमची धुरा सांभाळली. त्यामुळे उपकर्णधार या नात्याने हार्दिकलाच कर्णधार म्हणून नियुक्त केलं जायला हवं होतं, असं म्हटलं जात आहे.
उपकर्णधारपदही गेलं
हार्दिक एकदिवसीय संघात उपकर्णधार होता. मात्र बीसीसीआयने इथेही त्याचे पंख छाटलेत. श्रीलंका दौऱ्यातील टी 20 आणि वनडे या दोन्ही मालिकांसाठी युवा शुबमन गिल याला उपकर्णधार करण्यात आलं आहे. त्यामुळे हार्दिकचं उपकर्णधारपदीही गेलं आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने नुकतंच झिंबाब्वे विरुद्ध 4-1 फरकाने टी 20i मालिका जिंकली.
नेटकरी काय म्हणतायत?
दरम्यान हार्दिकला कर्णधार न केल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी थेट बीसीसीआय आणि गौतम गंभीरवर हल्लाबोल केला आहे. “राजकारण जिंकलं, पीआर जिंकलं, कामगिरी आणि माणुसकीचा पराभव झाला, बीसीसीआय आणि गंभीर शेम ऑन यू”, अशी पोस्ट एका हार्दिक चाहत्याने केली आहे.
हार्दिक चाहते नाराज
Politics won PR won Favouritism won Performance lost Humanity lost 💔@BCCI @GautamGambhir shame on you 😭💔#hardikpandya pic.twitter.com/Toz97C6oW2
— Shivanshu Mishra (कट्टर हार्दिक समर्थक) (@Shivanshu_26) July 18, 2024
टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकप्तान), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.