IND vs SL: टीम इंडियाकडून ‘क्लीन स्वीप’ची हॅट्रिक, श्रेयस अय्यर विजयाचा ‘हिरो’? समजून घ्या त्याची जबरदस्त फलंदाजी

| Updated on: Feb 27, 2022 | 11:19 PM

IND vs SL: सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने (Indian cricket team) श्रीलंके विरुद्धचा तिसरा टी 20 सामना सहा विकेटने जिंकला.

IND vs SL: टीम इंडियाकडून ‘क्लीन स्वीप’ची हॅट्रिक, श्रेयस अय्यर विजयाचा हिरो? समजून घ्या त्याची जबरदस्त फलंदाजी
Follow us on

धर्मशाळा: सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने (Indian cricket team) श्रीलंके विरुद्धचा तिसरा टी 20 सामना सहा विकेटने जिंकला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेले 147 धावांचे टार्गेट आरामात पार केले. या सामन्यातही श्रेयस अय्यर (Shreyas iyer) हिरो ठरला. त्याच्या 45 चेंडूतील नाबाद 73 धावांच्या बळावर भारताने हा विजय संपादन केला. श्रेयसने आज अर्धशतकांची हॅट्रीक पूर्ण केली. या मालिकेत श्रेयसने एकट्याने 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी T 20 मध्ये आतापर्यंत कुठल्याही भारतीय क्रिकेटपटूला करता आलेली नाही. श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजाने (Ravindra jadeja) भारताच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब केलं. मायदेशात झालेल्या मालिकेत भारताने क्लीन स्वीपची ही हॅट्रिक केली आहे.

न्यूझीलंडपासून विजयाची सुरुवात

याची सुरुवात न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेपासून झाली होती. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि आता श्रीलंका. भारतीय संघाने वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत बरेच बदल करुन पाहिले. प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन नव्या खेळाडूंना संधी दिली. सर्वच खेळाडूंनी मिळालेल्या संधीचं सोन केलं. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून संघ बांधणीच्या दृष्टीने हे बदल करुन पाहिले. आजच्या सामन्यात श्रेयस अय्यरने शानदार खेळ दाखवला. यापूर्वी श्रेयसने नाबाद 57, 74 धावांची खेळी केली होती. आजही तोच फॉर्म कायम होता.

का श्रेयसची फलंदाजी वेगळी भासली?

श्रेयसने वेगाने धावा केल्याच पण उगाचच अतातयी फटके मारुन विकेट गमावली नाही. तो शेवटपर्यंत क्रीझवर टिकून राहिला व संघासाठी फिनिशरची भूमिका बजावली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याला तिसऱ्या क्रमाकांवर बढती मिळाली होती. त्याचा श्रेयसने पुरेपूर फायदा उचलला. या संपूर्ण मालिकेत श्रेयसने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. आजच्या त्याच्या 73 धावांच्या खेळीत नऊ चौकार आणि एक षटकार होता.

संजू सॅमसन, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा बाद झाल्यानंतरही त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. IPL 2022 आधी श्रेयसची ही फलंदाजी पाहून केकेआरचा संघ नक्कीच खूष झाला असेल. त्यांनी श्रेयसला कर्णधार बनवलं आहे. रवींद्र जाडेजाने आज 22 धावा करुन श्रेयसला चांगली साथ दिली. या जोडीनेच नाबाद रहात भारताच्या मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केलं.