तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 43 धावांनी धुव्वा उडवला. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागली. पण कर्णधार सूर्यकुमार यादवचीही अशीच इच्छा होती. त्यामुळे मनासारखं झालं आणि पहिल्या डावात फलंदाजीही जबरदस्त झाली. यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. तर सूर्यकुमार यादवने 58 आणि ऋषभ पंतने 49 धावा करत मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. पण त्यानंतर भारतीय संघाचा डाव अडखळला. हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकु सिंह एकेरी धावा करून तंबूत परतले. असं असूनही टीम इंडियाने 20 षटकात 7 गडी 213 धावा केल्या आणि विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने चांगली सुरुवात केली. असं वाटलं की भारताला विजय मिळवणं कठीण होतं की काय? पण टीम इंडियाने कमबॅक केलं. श्रीलंकेची 84 धावांवर पहिली आणि त्यानंतर 140 या धावसंख्येवर दुसरी विकेट पडली. पण टीम इंडियाने त्यानंतर कमबॅक केलं आणि 170 धावांवर श्रीलंकेचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला. मात्र या विजयानंतर दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनचं खेळणं अनिश्चित दिसत आहे.
पहिल्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता वाढली. त्यासाठी दोन जागा अशा होत्या की त्यावर दावा होऊ शकला असता. पण ऋषभ पंतने 33 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 49 धावा केल्या. त्यामुळे ऋषभ पंतची जागा मिळणं कठीण झालं. आता रियान परागची जागा मिळू शकली असती. पहिल्या डावात 6 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 7 धावा करून बाद झाला होता. पण गोलंदाजीत त्याने कमाल केली. फक्त 8 चेंडू टाकत 5 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. त्यामुळे पुढच्या सामन्यात त्याचा पत्ता कापणं कठीण आहे.
रिंकु सिंहच्या जागी संजूला जागा मिळू शकणं कठीण आहे. कारण डेथ ओव्हरमध्ये त्याच्या वाटेला फक्त सहा चेंडू आले होते. त्यात तो दोन चेंडू खेळून बाद झाला आणि एक धाव केली. अशात त्याला खेळण्याची संधी मिळाली नसताना त्याच्या जागी संजूला घेणं कठीण आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही आहे तीच प्लेइंग इलेव्हन असू शकते. दुसरा सामना 24 तासांनी असल्याने त्यात काही बदल होईल असंही नाही. त्यामुळे आता कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर काय निर्णय घेतो याकडे लक्ष लागून आहे.