मुंबई : कर्णधार रोहित शर्मा भारताचा ओपनिंग बॅट्समन आहे. संघासाठी त्याने अनेकदा चांगली सुरुवात करून दिली आहे. मात्र वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. इतकंच काय तर विराट कोहलीही फलंदाजीसाठी उतरला नाही. उलट सुलट बॅटिंग ऑर्डर पाहून क्रीडाप्रेमीही चक्रावून गेले. विजयासाठी 50 षटकात फक्त 50 धावांचं आव्हान असताना रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर का उतरला? असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत आता रोहित शर्मा यानेच खुलासा केला आहे.
“मी कधीच विचार केला नव्हता की खेळपट्टी अशी असेल. त्यामुळे मी विचार केला की पहिल्यांदा गोलंदाजी करून दिलेल्या धावांचं आव्हान गाठायचं. खेळपट्टी सीमर्स आणि फिरकीसाठी चांगली होती. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मी जेव्हा भारतासाठी पहिल्यांदा खेळलो तेव्हा सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. मला त्या दिवसाची आठवण आली.”, असं रोहित शर्मा याने सांगितलं.
“वनडेमध्ये खेळण्यासाठी मी खेळाडूंना वेळ देऊ इच्छित होतो. जे संघात आहेत त्यांचं परीक्षण करत आहोत. त्यांना 115 धावांवर रोखू असं आम्हाला माहिती होतं. त्यामुळे काही जणांना संधी देऊन परीक्षण करता येऊ शकतं. मला वाटत नाही त्यांना या पद्धतीने संधी मिळेल. मुकेशने चांगली गोलंदाजी केली. तो चांगला स्विंग करतो. ईशानने चांगली फलंदाजी केली.”, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.
वेस्ट इंडिजने विजयासाठी 115 धावांचं आव्हान दिलं असताना ते गाठणं भारताला सहज सोपं झालं नाही. पाच गडी गमवून भारताने हे आव्हान गाठलं. ओपनिंगला आलेल्या ईशान किशन याने 46 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या. शुभमन गिल काही खास करू शकला नाही. आतापर्यंतच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात हव्या तशा धावा त्याला करता आल्या नाहीत.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायले मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स आणि गुडाकेश मोती.