IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत भारताला असं करणं परवडणारं नाही, जाणून घ्या त्या मागचं कारण
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारत या मालिकेत दोन सामने खेळणार आहे. या मालिकेकतील विजय भारताला खूपच महत्त्वाचा आहे. जाणून घ्या त्यामागचं कारण
मुंबई : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून या मालिकेतील विजयाला खूपच महत्त्व आहे. कारण या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट चॅमप्यिनशिपच्या साखळीला सुरुवात होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया भविष्याच्या दृष्टीकोनातून काही प्रयोगांसह उतरणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या तुलनेत दुबळा मानला जात आहे. मात्र विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. ही मालिका जिंकणं भारतासाठी खूपच महत्त्वाचं आहे. कारण यानंतर भारताला इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या तगड्या संघांशी दोन हात करायचे आहेत.
वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी विजय का महत्त्वाचा
भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून सुरुवात करत आहे. या मालिकेत भारतीय संघात मोठे बदल करण्यात आलं आहे. या मालिकेतील खेळाडूंच्या कामगिरीवर भवितव्य अवलंबून असणार आहे. काही खेळाडूंचं वय पाहता त्यांना येत्या मालिकांमधून वगळण्याची शक्यता आहे. तर नवोदित खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न असणार आहे.
भारतसमोरील आव्हानं
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर या वर्षाच्या शेवटी टीम इंडिया दोन कसोटी मालिकांसाठी दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे. त्यानंतर इंग्लंडचा संघ पाच कसोटी सामन्यांसाठी भारतात येणार आहे. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये बांगलादेशचा संघ भारतात येईल. न्यूझीलंडसोबत तीन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. सर्वात शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रेकॉर्ड
- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकूण 98 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात 30 सामने वेस्ट इंडिजने, तर 22 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. 46 सामने अनिर्णित ठरले आहेत.
- कॅरेबियन धरतीवर दोन्ही संघ 51 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात 16 वेळा वेस्ट इंडिजने, तर 9 वेळा टीम इंडियाने विजय मिळवला आहे. 26 सामने अनिर्णित ठरले आहेत.
- 21 व्या शतकात भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध 28 कसोटी सामने खेळले. त्यात भारताने 15 जिंकले असून दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
- मागच्या 5 कसोटी सामन्यांच्या निकालाबाबत सांगायचं तर भारताने 4 सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. तर एक सामना ड्रॉ राहिला आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशान किशन, श्रीकर भरत, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर.