Shubman Gill : शुभमन गिल याचं टीम इंडियातील स्थान धोक्यात! आणखी एक चूक पडेल चांगलीच महागात
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेच्या साखळी फेरीला सुरुवात झाली आहे. भारत पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिज विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात शुभमन गिलच्या खेळीकडे लक्ष असणार आहे.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमुळे कसोटी मालिकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. प्रत्येक कसोटी मालिका संघांसाठी महत्त्वाची आहे. कारण कसोटी मालिकेतील जय पराजय यावर अंतिम फेरीचं गणित ठरवलं जातं. भारताचा पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिज विरुद्ध 12 जुलैपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात बरेच बदल करण्यात आले असून नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. असं असताना भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिलं जाणाऱ्या शुभमन गिलच्या खेळीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण वनडे आणि टी 20 स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला कसोटीत चांगलाच कस लागणार आहे. शुभमन गिल याची कसोटीतील कामगिरी हवी तशी नाही. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात अपयश आलं तर मात्र कठीण होईल.
कसोटीत शुभमन गिल अपयशी!
शुभमन गिलची बॅट वनडे आणि टी 20 स्पर्धेत चांगलीच तळपली आहे.मात्र कसोटीत हवी तशी आकडेवारी नाही. गिलने टेस्ट क्रिकेटमध्ये दोन शतकं ठोकली आहेत. मात्र त्याच्यात सातत्याचा अभाव दिसून आला आहे. गिल याने आतापर्यंत 30 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 19 डावात त्याने 30 पेक्षा कमी धावा केल्या आहेत. पाचवेळी शुभमन गिल 20 ते 30 धावांच्या आत बाद झाला आहे.
खेळपट्टीवर तग धरूनही शुभमन गिल चांगल्या धावा करण्यात अपयशी ठरल्याचं आकडेवारीवरून समोर आलं आहे. खेळपट्टीवर जम बसवल्यानंतर बाद होणं क्रिकेटमध्ये अक्षम्य गुन्हा मानला जातो. गिलकडून हीच चूक वारंवार होताना दिसत आहे.
शुभमन गिलच्या फलंदाजीत नेमकं काय चुकतं?
शुभमन गिल एक क्लास फलंदाज आहे. त्याचं फलंदाजीचं तंत्र एकदम शास्त्रशुद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये शुभमन गिलने सिद्ध करून दाखवलं आहे. त्याने 50 हून अधिक सरासरीने धावा केल्या आहेत. शॉर्ट चेंडवरही गिल चांगल्याप्रकारे खेळतो. पण ऑफ साईटवर स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळताना चूक करून बसतो आणि इथेच सर्वकाही फसतं.
शुभमन गिलला कसोटी सामन्यात जेम्स अँडरसन याने चार वेळा बाद केलं आहे. अँडरसन चेंडू टाकल्यानंतर बाहेर काढण्यात माहीर आहे. त्याच्या ट्रॅपमध्ये शुभमन गिल अडकताना क्रीडाप्रेमींना पाहिलं आहे. अशीच चूक त्यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यात केली तर मात्र स्लिप झेल देऊन बाद होऊ शकतो. त्यामुळे अशा चेंडूवर ड्राईव्ह करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
शुभमन गिल याला डावललं तर…
शुभमन गिल हा टीम इंडियासाठी ओपनिंग करतो. पण सध्या निवडलेल्या संघात दोन ओपनर आहेत. त्यामुळे शुभमन गिलला आपली जागा शाबूत ठेवायची असेल तर फलंदाजीतून दाखवून द्यावं लागेल. यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाडच्या रुपाने दोन पर्यात भारतासमोर आहेत. त्यामुळे शुभमन गिल अपयशी ठरला तर मात्र या दोघांपैकी एक जण पुढच्या कसोटीत मैदानात उतरताना दिसू शकतो.