IND vs ZIM : शुबमन गिलची सावध कॅप्टन इनिंग, झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 183 धावांचं आव्हान
झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी चांगली सुरुवात केली. मात्र 200 पार नेण्यासाठी रेपो कायम ठेवता आला नाही. त्यामुळे 20 षटकात 182 धावा करता आल्या आणि विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं.
भारत झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु असून या मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांची संघात वर्णी लागली आहे. त्यामुळे षटकार आणि चौकारांची बरसात पाहायला मिळेल असं वाटत होतं. मात्र तसं काही झालं नाही. टीम इंडियाला 200 पार धावा नेता आल्या नाहीत. भारताने 20 षटकात 4 गडी गमवून 182 धावा केल्या आणि विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात शुबमन गिल याने सावध कॅप्टन इनिंग खेळली. 49 चेंडूत 134 च्या स्ट्राईक रेटने 66 धावा केल्या. पहिल्या दोन सामन्यात फेल गेल्यानंतर त्याने अर्धशतकी खेळी केली. यशस्वी जयस्वालने आक्रमक सुरुवात केली खरी पण त्याचा रेपो कायम ठेवता आला नाही. नंतर त्याच्या स्ट्राईक रेट खूपच कमी झाला. त्याने 27 चेंडूत 36 धावा केल्या. यात 4 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे, अभिषेक शर्माकडून या सामन्यात मोठी अपेक्षा होती. मात्र भ्रमनिरास झाला. 9 चेंडूत 10 धावा करून तंबूत परतला.
ऋतुराज गायकवाडने एक बाजू सावरून धरली. तसेच जबरदस्त 175 च्या स्ट्राईक रेटने प्रहार केला. पण त्याचं अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकलं. त्याने 28 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. रिंकु सिंह 1 चेंडू खेळत नाबाद 1 धाव, तर संजू सॅमसन 7 चेंडू खेळत नाबाद 12 धावांवर राहिला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा आणि ब्लेसिंग मुझराबानी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. या व्यतिरिक्त एकही गोलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, वेस्ली मधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जॉनथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा