IND vs ZIM 3rd T20 : भारताचा झिम्बाब्वेवर 23 धावांनी दमदार विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी
Ind vs Zim 3rd T20 : तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने यजमान झिम्बाब्वेचा सलग दुसरा पराभव केला आहे. शुबमन गिलच्या नेतृत्त्वात उतरलेल्या भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.
भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वे संघाचा 23 धावांनी पराभव केला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 182-4 धावा केल्या होत्या. भारतीय संघाचा कॅप्टन शुबमन गिल याने सर्वाधिक 66 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रुतुराज गायकवाड याने 49 धावा करत भारताला 180 धावांचा टप्पा पार करून दिला. या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघाला 20 ओव्हरमध्ये 159-6 धावाच करता आल्या. झिम्बाब्वेकडून डायन मायर्सने नाबाद 65 धावा आणि क्लाइव्ह मदांडेने 37 धावा केल्या, दोघांनीही विजयासाठी प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 3 तर आवेश खान याने 2 विकेट घेतल्या. भारताने आजच्या सामन्यात विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.
झिम्बाब्वेकडून तादिवानाशे मारुमणी आणि वेस्ली मधवेरे सलामील आले होते. दोघांनी सावध सुरूवात करण्याचा प्रयत्न केला होता. पण दुसऱ्याच ओव्हरध्ये आवेश खानने पहिल्याच बॉलवर वेस्ली मधवेरे याला (१ धाव) आऊट केलं. त्यानंतर ब्रायन बेनेट 4 धावा, सिकंदर रझा 15 धावा, जॉनथन कॅम्पबेल 1 धाव काढून आऊट झाले. वॉशिंग्टन सुंदरने सिकंदर रझा आणि जॉनथन कॅम्पबेल यांना सातव्या ओव्हरमध्ये माघारी पाठवलं होतं. झिम्बाब्वेची अवस्था 39-5 अशी झाली होती. मात्र डायन मायर्स आणि क्लाइव्ह मदांडे यांच्या भागीदारीमध्ये भारताच्या गोलंदाजांचा त्यांनी परीक्षा घेतली. डायन मायर्स याने नाबाद 65 धावा (7 चौकार, 1 षटकार) केल्या. तर क्लाइव्ह मदांडेने 37 (2 चौकार आणि 2 षटकार) मारले.
टीम इंडियाकडून आज सलामीला शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल आलेले पाहायला मिळाले. आजच्या सामन्यात वर्ल्ड कपमधील तीन खेळाडूंचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला. यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि संजू सॅमसन आज खेळले. सलामीला आलेल्या यशस्वीने 36 धावा केल्या. दोघांनी सुरूवात एकदम झकास केली होती मात्र त्यानंतर झिम्बाब्वेने चांगली गोलंदाजी केली. कमी धावा देत भारतीय संघावर दबाव टाकला. मात्र शुबमन गिल याने एक बाजू लावून धरलेली होती.
यशस्वी जयस्वाल आऊट झाल्यावर आलेला अभिषेक शर्मा 10 धावा काढून परतला. ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल यांनी मैदानात तळ ठोकला. सामन्याच्या शेवटच्या काही ओव्हरमध्ये ऋतुराजने टॉप गियर टाकला. शुबमन गिलने 49 बॉलमध्ये 66 धावा केल्या, यामध्ये त्याने 7 चौकार आणि 3 षटकार मारले. तर रूतुराज गायकवाड याने 29 बॉलमध्ये 49 धावांची आक्रमक खेळी केली. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. संजू सॅमसन 12 धावा आणि रिंकू सिंह 1 धाव करून नाबाद राहिले. आता चौथा टी-20 सामना 14 जुलैला होणार आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), रूतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, वेस्ली मधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जॉनथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा