IND vs ZIM : शुबमन गिलच्या नेतृत्वात आणखी एका खेळाडूचं पदार्पण, आता मिळाली मराठमोळ्या गोलंदाजाला संधी
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात चौथा टी20 सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून शुबमन गिलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तसेच एक बदल करून मराठमोळ्या गोलंदाजाला पदार्पणाची संधी दिली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात हे सहावं पदार्पण आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. चौथा सामना हा निर्णायक असल्याने झिम्बाब्वेसाठी विजय खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना गमवला तर टीम इंडिया ही मालिका खिशात घालेल. दरम्यान, नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला. सलग चार नाणेफेक जिंकण्यात शुबमन गिलला यश आलं. दुसरीकडे, पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने भारताला पराभूत केलं होतं. विजयासाठी दिलेल्या 115 धावा भारताला करता आल्या नव्हत्या. तसेच 13 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. मात्र त्यानंतरच्या दोन सामन्यात टीम इंडियाने कमबॅक केलं. शुबमन गिलच्या नेतृत्वात आतापर्यंतच्या चार सामन्यात कोणी ना कोणी पदार्पण केलं आहे. आता मराठमोळ्या तुषार देशपांडेला संधी मिळाली आहे. तुषार देशपांडे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. तसेच त्याने डेथ ओव्हरमध्ये चांगली कामगिरी आहे. त्यामुळे त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आवेश खानच्या जागी त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी देण्यात आली आहे.
कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. विकेट फ्रेश दिसत ाहे. आशा आहे की वेगवान गोलंदाजांसाठी त्यात काहीतरी करतील. डेथ बॉलिंगमध्ये आपण सुधारणा करू शकतो. मागील सामन्यात आम्ही थोडे आत्मसंतुष्ट झालो. आवेश खानच्या जागी तुषार देशपांडे पदार्पण करत आहे.” दुसरीकडे, झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने निर्णय मनासारखा झाल्याचं सांगितलं आहे. प्रथम फलंदाजीच करायची होतं असं त्याने सांगितलं.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद