IND vs ZIM : टी20 वर्ल्डकप विजयाच्या रंगात भंग, झिम्बाब्वेने टीम इंडियाला 13 धावांनी लोळवलं
टी20 वर्ल्डकप विजयानंतर भारताचा पहिलाच झिम्बाब्वे दौरा आहे. पाच सामन्याच्या टी20 मालिका असून यात झिम्बाब्वेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाचा दारूण पराभव झाला आहे. झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेल्या 116 धावा भारताला करता आल्या नाहीत.
टी20 क्रिकेटमध्ये नव्या संघाची बांधणी म्हणून झिम्बाब्वे दौऱ्याकडे पाहिलं जात आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत कोण कशी कामगिरी करतं याकडे लक्ष आहे. असं असताना पहिल्याच सामन्यात भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. झिम्बाब्वेने भारताला 13 धावांनी पराभूत केलं. कर्णधार शुबमन गिल याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसल्याचं दिसून आलं. झिम्बाब्वेने 20 षटकात 9 गडी गमवून 115 धावा केल्या आणि विजयासाठी 116 धावांचं आव्हान दिलं. आयपीएलमधील हिरोंसाठी ही धावसंख्या तशी सोपी होती. मात्र सर्वच रंगाचा भंग झाल्याचं दिसून आलं. एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला. कर्णधार शुबमन गिलने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र विजयाच्या वेशीपर्यंत नेऊ शकला नाही. त्यामुळे भारतावर पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारण्याची वेळ आहे. शुबमन गिलने 29 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. मात्र इतर एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.टी20 क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेकडून पराभव स्वीकारणारा शुबमन गिल हा तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि अजिंक्य रहाणे या यादीत होते. दुसरीकडे, 2024 या वर्षातील टीम इंडियाचा पहिलाच पराभव आहे.
झटपट विकेट पडत असताना चेंडू आणि धावांमधील अंतरही वाढत होतं. त्यामुळे शेपटाकडेच्या फलंदाजांना फलंदाजी करणं खूपच कठीण गेलं. त्यात दिग्गज फलंदाज तग धरू शकले नाही, तर आपली काय गत असंच त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. आयपीएलमध्ये हिरो ठरलेले अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच फेल ठरले. अभिषेक शर्माला तर आपलं खातंही खोलता आलं नाही. रियाने परागने 2, तर ध्रुव जुरेलने 7 धावा केल्या. रिंकू सिंहकडून भरपूर अपेक्षा असताना त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. आयपीएलमध्ये हिरो ठरलेले हे खेळाडू मात्र झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात झिरो ठरले. वॉशिंग्टन सुंदरने 34 चेंडूत 1 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 27 धावा केल्या. मात्र विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, इनोसंट कैया,ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे, वेलिंग्टन मसाकडझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद