IND vs ZIM : टीम इंडियाची भीती खरी ठरली, वनडे सुरू होण्यापूर्वीच संकट, स्टार खेळाडू दुखापतीमुळे पुन्हा बाहेर
IND vs ZIM : भारत आणि झिम्बाबे यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 18 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यामुळे तीन स्टार खेळाडू दुखापतीनंतर परतणार होते. मात्र, पुन्हा संकट उभं राहिलंय.
नवी दिल्ली : ज्याची भीती वाटत होती ती आता खरी ठरली आहे. दुखापतीनंतर भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) युवा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचे (Washington Sundar) पुनरागमन लांबले आहे. पुन्हा एकदा दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदरची कारकीर्द थांबली आहे. कौंटी क्रिकेटमध्ये दुखापतीमुळे सुंदर 18 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या भारत-झिम्बाब्वे (IND vs ZIM) मालिकेतून बाहेर पडला आहे . भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 3 एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत, ज्याद्वारे सुंदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार होता. गेल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये झालेल्या रॉयल लंडन वन डे चषकादरम्यान सुंदरच्या खांद्याला दुखापत झाली होती. तो लँकेशायर काउंटी क्लबकडून खेळत होता आणि क्षेत्ररक्षण करताना त्याला ही दुखापत झाली. तेव्हापासून या मालिकेत त्याच्या खेळावर भीतीचे ढग दाटून आले. आता हे खरे असल्याचे सिद्ध झाले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार 22 वर्षीय वॉशिंग्टन सुंदरला या दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागेल आणि अशा परिस्थितीत तो तीन सामन्यांच्या मालिकेत खेळू शकणार नाही.
सुंदर एनसीएमध्ये परतणार?
फेब्रुवारीपासून सुंदरला दुखापतीमुळे टीम इंडियासाठी एकही सामना खेळता आलेला नाही आणि आता पुन्हा पुनरागमन करण्यासाठी त्याला आणखी वेळ लागणार हे निश्चित आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने याबाबत पीटीआयला सांगितले की, “होय, वॉशिंग्टन सुंदरला झिम्बाब्वे मालिकेतून वगळण्यात आले आहे. रॉयल लंडन चषक स्पर्धेत लँकेशायर आणि वूस्टरशायर यांच्यातील सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन करावे लागेल.
फिटनेस समस्यांनी भरलेले वर्ष
ऑफ-स्पिन-ऑलराउंडरसाठी गेले एक वर्ष फिटनेस-संबंधित समस्यांनी भरलेले आहे. गतवर्षी इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया आणि कौंटी संघ यांच्यातील सराव सामन्यादरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली होती, त्यामुळे तो सुमारे 4-5 महिने बाहेर होता. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने पुनरागमन केले आणि जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड झाली. या ठिकाणी जाण्यापूर्वीच कोरोना संसर्गाने ही संधी हिरावून घेतली.
त्यानंतर तो फेब्रुवारीमध्ये परतला आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळला, पण हाताच्या दुखापतीमुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या T20I मालिकेतून बाहेर पडला. यानंतर सुंदरने आयपीएल 2022 मधून पुनरागमन केले, परंतु येथेही त्याच्या बोटाला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला काही सामन्यांमधून बाहेर बसावे लागले. आयपीएलनंतर त्याला काऊंटी क्रिकेटमध्ये पाठवण्यात आले, जिथे तो चांगली कामगिरी करत होता, पण आता या दुखापतीने त्याच्या कारकिर्दीत पुन्हा व्यत्यय आणला आहे.