IND vs ZIM : टीम इंडियाच्या खेळाडूंनी रवि बिश्नोईच्या झेलचं केलं असं कौतुक, पाहा संपूर्ण व्हिडीओ

| Updated on: Jul 11, 2024 | 5:51 PM

भारत विरुद्ध झिम्बाब्वे या तिसऱ्या टी20 सामन्यात रवि बिश्नोईने जबरदस्त झेल घेतला. या झेलचं बरंच कौतुक होत आहे. असं असताना बीसीसीआयने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात भारतीय संघातील खेळाडूंनी त्यांच्या शैलीत या झेलचं वर्णन केलं आहे. कोण काय बोललं ते जाणून घेऊयात

IND vs ZIM : टीम इंडियाच्या खेळाडूंनी रवि बिश्नोईच्या झेलचं केलं असं कौतुक, पाहा संपूर्ण व्हिडीओ
Follow us on

झिम्बाब्वे विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. दुसऱ्या सामन्यात 100 धावांनी, तर तिसऱ्या सामन्यात 23 धावांनी पराभूत केलं. तिसऱ्या सामन्यात रवि बिश्नोईने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आवेश खानच्या गोलंदाजीवर रवि बिश्नोईने उत्कृष्ट झेल घेतला. बॅनेट या चेंडूवर जोरात प्रहार करत बॅकफूट पॉइंटच्या वरून जाईल असा मारला. पण रवि बिश्नोईने डोळ्याची पापणी लवण्याच्या आतच उंच उडी घेत झेल पकडला. बॅनेटलाही हा झेल घेतल्यानंतर विश्वासच बसला नाही. यावेळी तो काही सेकंद खेळपट्टीवर थांबला आणि स्मितहास्य करून तंबूच्या दिशेने परतला. त्याच्या या झेलचं सर्वत्र कौतुक होत आहे. असं असताना बीसीसीआयने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात कर्णधार शुबमन गिलसह इतर खेळाडूच्या त्याच्या झेलचं कौतुक करत आहे. आवेश खानने या विकेटचं संपूर्ण श्रेय रवि बिश्नोईला दिलं. ‘माझ्या गोलंदाजीवर ही विकेट मिळाली. पण ही विकेट खऱ्या अर्थाने रवि बिश्नोईची आहे.’, असं आवेश खान म्हणाला.

“त्याने झेल घेतल्यानंतर त्याला आणि आम्हाला व्यक्त होण्याची संधीच मिळाली नाही. आम्हीपण शॉकमध्ये होतो की त्याने कसा झेल पकडला. खूप चांगला फिल्डर आहे. तो कायम आपल्या फिल्डिंगवर मेहनत करतो. ती विकेट माझी असली तरी त्याच्या खात्यात जायला हवी,” असं आवेश खानने सांगितलं. यावेळी त्याने रवि बिश्नोई याची मुलाखतही घेतली. “आज आपल्यासोबत आहे रवि बिश्नोई. पहिला चर्चा करू त्याच्या झेलची..झेल घेतल्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया काय होती ते जाणून घेऊयात. आम्हाला तर जराही संधी मिळाली नाही व्यक्त होण्याची.”, असं मुलाखतीत आवेश खान म्हणाला.


रवि बिश्नोईने सांगितलं की, “झेल घेतल्यानंतर खूप आनंद वाटला. गेल्या दोन दिवसांपासून फिल्डिंगबाबत चर्चा करत होतो. हे असं पहिल्यांदा नाही की मी आवेश खानच्या गोलंदाजीव असा झेल पकडला. हे माझ्यासाठी नवीन नाही.” त्यानंतर आवेश खानने सांगितलं की, पहिला माझ्या चेंडूवर एक झेल सोडला होता. पण ट्राय खूप छान केलं होतं. पण चेंडू हातात आला नाही.

“मला तो झेल जवळून बघण्याची संधी मिळाली. मी त्याच्या जवळ मिडऑनला उभा होतो. कॅच कसा पकडला हे संपूर्ण दृष्य माझ्या डोळ्यात कैद झालं. रॉकेटच्या वेगाने चेंडू आला होता. रवि बिश्नोईने जबरदस्त झेल घेतला.”, असं अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने सांगितलं. तर रिंकु सिंह स्तुती करताना सांगितलं की, “खूप जबरदस्त झेल होता. असं नाही की त्याने असा झेल पहिल्यांदा पकडला आहे. आयपीएलमध्ये बरेच झेल पकडले आहेत.”

झिम्बाब्वे दौऱ्यात टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या शुबमन गिलनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली. “पहिलं तर मी खूप आनंदी आहे की टीम इंडियाने 2-1 ने आघाडी घेतली. बिश्नोईने घेतलेला झेल अप्रतिम होता. फिल्डिंग हा कोणत्याही सामन्याचा दुवा असतो. जेव्हा तुम्ही फिल्डिंगचा आनंद घेता तेव्हा तुम्ही सामन्यात असता.”, असं शुबमन गिलने सांगितलं.