IND vs ZIM : झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाचे वाटेकरी कोण? जाणून कुठे काय चुकलं ते
टी20 वर्ल्डकप विजयानंतर भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव झाला आहे. झिम्बाब्वेसारख्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाने भारताला 13 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे भारताचं भविष्य योग्य हाती असेल ना असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. पराभवाची कारणं शोधताना नेमकं काय चुकलं ते जाणून घेऊयात.
झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर शुबमन गिलचा हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. या मैदानातील मागचा रेकॉर्ड पाहता प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची विजयी टक्केवारी चांगली आहे. या मैदानात एकूण 50 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले गेले आहेत. आताचा सामना 51 वा ठरला. या सामन्याची बेरीज धरली तर 30 सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा, तर 21 सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे.हरारेची खेळपट्टी ही फलंदाजांना मदत करणारी आहे. पण तसं काही दिसलं नाही. दुसरीकडे, गोलंदाजी निवडल्यानंतर पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीचे योग्य पर्याय निवडणं शुबमन गिलला जमलं नाही, असंच म्हणावं लागेल. सहा षटकांपैकी पाच षटकं ही खलील अहमद आणि मुकेश कुमार यांनी टाकली. खलील अहमदने 3 षटकात 28 धावा दिल्या. तर मुकेश कुमारने 2 षटकात 12 धावा देत 1 गडी बाद केला. खरं तर चार षटकानंतरच वेगळा पर्याय निवडणं गरजेचं होतं. कारण चार षटकापर्यंत हे दोन्ही गोलंदाज बरोबर चालले होते. त्यांचा उपयोग डेथ ओव्हरमध्ये करता आला असता. पण खलील अहमदने टाकलेलं संघाचं पाचवं आणि वैयक्तिक तिसरं षटक महागात पडलं. त्यात त्याने 17 धावा दिल्या.
झिम्बाब्वेच्या 90 धावांवर 9 विकेट असताना टेंडई चतारा आणइ क्लाईव्ह मडांडे जोडीने चांगलंच झुंजवलं. या जोडीने 18 चेंडूंचा सामना केला आणि त्यात 25 धावांची भर घातली. या 25 धावा टीम इंडियाला खूपच महागात पडल्या. क्लाईव्हने एकट्याने या 25 धावा केल्या .तर टेंडईने 9 चेंडूंचा सामना करत एकही धाव काढली नाही.खरं तर झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताचा नवखा संघ आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याचं एक वेगळंच दडपण नवख्या खेळाडूंवर जाणवलं. अभिषेक शर्मा पहिल्या तीन चेंडूतच संयम सोडून बसला. ऋतुराज गायकवाडही शुबमन गिलला साथ देऊ शकला नाही.
एकीकडे, शुबमन गिल उभा असताना दुसरीकडे विकेट पडत होत्या. रियान पराग, ध्रुव जुरेल पदार्पणाच्या सामन्यात फेल ठरले. रिंकु सिंह हा भरवशाचा खेळाडूही अयशस्वी ठरला. आवेश खानने फटकेबाजी करत सामन्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही आतातायीपणा शेवटी नडला. वॉशिंग्टन सुंदरने सामना जिंकवण्याचा प्रयत्न केला. मात्र नॉन स्ट्राईकला त्या ताकदीचा फलंदाज नसल्याने धावा घेणं टाळलं. मात्र यामुळे चेंडू आणि धावांमधील अंतर वाढत गेलं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, इनोसंट कैया,ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे, वेलिंग्टन मसाकडझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद