IND vs AUS 2nd T20 : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर सलग दुसरा विजय, मालिकेत आघाडी
IND vs AUS 2nd T-20 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या टी-20 सामन्यातही विजय मिळवला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात कांगारूंचा पराभव झाला आहे. टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. पहिल्यांदा बॅटींग करताना टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 235-4 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाचा डाव 191-9 धावांवर आटोपला. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टॉयनिस याने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कांगारूंच्या संघाने दमदार सुरूवात केली होती. कारण मॅथ्यू शॉर्ट याने आक्रमक रूप धारण केलं होतं, मात्र 19 धावांवर त्याला रवी बिश्नोईने माघारी पाठवलं. 35 वर पहिली विकेट गेल्यावर कांगारूंना भारतीय गोलंदाजांना सलग तीन मोठे झटके दिले. स्टीव्ह स्मिथ 19 धावा, मागील सामन्यामधील शतकवीर जोश इंग्लिसलाही 2 धावांवर रवीने आऊट केलं. घातक ग्लेन मॅक्सवेला अक्षर पटेलने आपल्या जाळ्यात ओढत 12 धावांवर माघारी पाठवलं.
मार्कस स्टॉइनिस आणि टिम डेव्हिड यांनी भागीदारी केली होती. दोघांच्या भागीदारीने भारतीय गोलंदाजांवर काहीसा दबाव निर्माण झालेला पाहायला मिळत होता. मात्र बिश्नोईने परत एकदा टिम डेव्हिडला आऊट करत टीमसाठी कमबॅक करून दिलं. कर्णधार मॅथ्यू वेड हा शेवटपर्यंत 42 धावांवर नाबाद राहिला. शेवटला येत त्याने भारतीय गोलंदाजांचा क्लास घेतला. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला कोणाची साथ मिळाली नाही. भारताने 44 धावांनी विजय मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने सलग दुसरा विजय मिळवला आहे.
भारताची बॅटींग
भारताकडून यशस्वी जयस्वाल 53 धावा, ऋतुराज गायकवाड 58 धावा , इशान किशन 52 धावा या तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 200 पर्यंतचा टप्पा गाठला. त्यानंतर रिंकू सिंह याचा अवघ्या 9 बॉलमध्ये 31 धावांच्या जोरावर भारताने 235 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या होत्या.
दोन्ही संघाचे खेळाडू
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (w), सूर्यकुमार यादव (C), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसीद कृष्णा.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (w/c), शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, तन्वीर संघा