आयर्लंडचा दारूण पराभव केल्यानंतरही स्मृती मंधानाने व्यक्त केली खंत, म्हणाली…
भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आयर्लंडला व्हाईट वॉश दिला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 435 धावांचं आव्हान दिलं होतं. तसेच 131 धावांवरच आयर्लंडला गुंडाळलं. तरीही कर्णधार स्मृती मंधानाने एक खंत व्यक्त केली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात आयर्लंडचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारताने 435 धावांचं मोठं आव्हान आयर्लंडसमोर ठेवलं होतं. यात प्रतिका रावलने 154, तर स्मृती मंधानाने 135 धावांची खेळी केली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 233 धावांची मोठी भागीदारी केली. इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ 131 धावांवरच गारद झाला. भारताने आयर्लंडवर 304 धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी मात मिळवली आणि व्हाईट वॉश दिला. या मालिकेत जबरदस्त कामगिरी केली म्हणून प्रतिका रावलला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. इतकंच काय शेवटच्या सामन्यात तिने केलेली कामगिरीही उल्लेखनीय होती. त्यामुळे सामनावीराचा पुरस्कारही तिलाच मिळाला. दुसरीकडे, कर्णधार स्मृती मंधाना फॉर्म जबरदस्त असल्याचं अधोरेखित झालं आहे. सलग आठ सामन्यात तिने 50 हून अधिक धावा करण्याची लय कायम ठेवली आहे. या सामन्यानंतर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. आयर्लंडचा दारूण पराभव केल्यानंतरही तिने काही गोष्टींबाबत खंत व्यक्त केली आहे. वर्ल्डकपच्या दृष्टीने येत्या काही दिवसात या उणीवांवर काम होण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे.
“आज मालिका विजयाचा जितका आनंद घ्यायचा आहे, तितकाच विश्वचषकासाठी लूपमध्ये राहायचे आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. कदाचित उद्या आपल्याला काय काम करायचे आहे हे लक्षात राहील. आम्हाला आमच्या क्षेत्ररक्षणावर आणि रन घेताना संवादावर काम करायचे आहे. या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतील आणि या दोन विभागात आम्ही चांगले खेळलो, तर विश्वचषकात आम्ही काही खास करू शकू.”, असं कर्णधार स्मृती मंधाना हीने सांगितलं. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं भारताकडे यजमानपद आहे. दुसरीकडे, महिला क्रिकेट संघाकडे एकही आयसीसी ट्रॉफी नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे त्याची उणीव वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भरून काढणार का? हा प्रश्न आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
आयर्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सारा फोर्ब्स, गेबी लुईस (कर्णधार), कुल्टर रेली (विकेटकीपर), ओरला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलेनी, लेआ पॉल, आर्लेन केली, अवा कॅनिंग, जॉर्जिना डेम्पसे, फ्रेया सार्जेंट, अलाना डॅलझेल.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, सायली सातघरे, मिन्नू मणी, तनुजा कंवर, तीतस साधू.