वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 173 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण श्रीलंकेचा संघ धावा करू शकला. त्यामुळे भारताच्या नेट रनरेटमध्ये जबरदस्त सुधारणा झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताने 58 धावांनी सामना गमावला होता. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान जर तर वर अवलंबून होतं. त्यामुळे मोठ्या फरकाने विजय मिळवणं खूपच गरजेचं होतं. भारताने ही कसर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भरून काढली. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकात 3 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेला सर्व गडी बाद फक्त 90 धावा करता आल्या. यासह भारताने 82 धावांनी दणदणीत विजय मिळवला. स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी अर्धशतकी खेळी केली. यासह भारताने आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताचा शेवटचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवला तरी भारताचं उपांत्य फेरीचं स्थान पक्कं होईल असं चित्र आहे.
या विजयापूर्वी भारतीय संघ 2 गुण आणि -1.217 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर होता. विजयानंतर हे गणित बदललं आहे. भारताने एकूण 4 गुण कमवत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर भारताचा नेट रनरेट हा +0.576 इतका झाला आहे. ऑस्ट्रेलियाने दोन पैकी दोन सामन्यात विजय मिळवून 4 गुण आणि +2.524 नेट रनरेटसह अव्वल स्थान पटकावलं आहे. पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर असून 2 गुण आणि +0.555 नेट रनरेट आहे. न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर फेकला गेला असून 2 गुण आणि -0.050 नेट रनरेट आहे. तर श्रीलंकेने स्पर्धेतील तीन सामने सलग गमवल्याने आव्हान संपुष्टात आलं आहे.
भारताकडून आशा शोभना ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली तीने 4 षटकात 19 धावा देत 3 गडी बाद केले. अरुंधती रेड्डीने 4 षटकात 19 धावा देत 3 गडी बाद केले. रेणुका सिंह ठाकुरने 4 षटकात 16 धावा देत 2 गडी बाद केले. श्रेयंका पाटीलने 4 षटकात 15 धावा देत एक गडी बाद केला. दीप्ती शर्माने शेवटच्या षटकात विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सजीवन सजना, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग .
श्रीलंका महिला (प्लेइंग इलेव्हन): विश्मी गुणरत्ने, चामारी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), अमा कांचना, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनवेरा, इनोवा रनवीरा.