वर्ल्डकपमध्ये भारताच्या पराभवानंतर अब्दुल रझ्झाकने गरळ ओकली, आता तर असं काही म्हणून गेला
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाची जखम आता न भरून निघणारी आहे. कारण शेवटच्या सामन्यातील पराभवामुळे कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं. या धक्क्यातून सावरलो तरी तरी जखम खोलवर असेल यात शंका नाही. त्यात पाकिस्तानला भारताच्या पराभवाच्या असुरी आनंद झाला आहे. अब्दुल रझ्झाकने भारताच्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ चोळलं आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पराभवामुळे पाकिस्तानला सर्वाधिक आनंद झाल्याचं दिसत आहे. रोज कोण ना कोणतरी भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत असतो. भारताने गेल्या दहा वर्षात एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. त्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत संधी चालून आली होती. पण ही संधी ऑस्ट्रेलियाने हिरावून नेली. त्यामुळे साखळी फेरीत आव्हान संपुष्टात आलेल्या पाकिस्तानने टोमणे मारण्याची एकही संधी सोडली नाही. आता यात माजी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाक याची भर पडली आहे. ऐश्वर्या रायच्या वक्तव्यावरून अब्दुल रझ्झाकला नुकतीच माफी मागावी लागली होती. आता पुन्हा एकदा बेताल वक्तव्यामुळे अब्दुल रझ्झाक चर्चेत आला आहे. भारतीय क्रिकेटबाबत नकारात्मक वक्तव्य केलं आहे. रझ्झाकच्या वक्तव्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “अंतिम फेरीत भारत पराभूत झाला हे क्रिकेटसाठी चांगलंच आहे.”,असं मत त्याने मांडलं आहे.
“क्रिकेट जिंकला आणि भारत हारला. जर भारताने वर्ल्डकप जिंकला असता तर क्रिकेटसाठी सर्वात वाईट असतं. त्यांनी प्रत्येक संधीचा फायदा घेतला होता. मी यापूर्वी कधीच अंतिम फेरीसाठी असे पिच बघितले नव्हते. खरंच खूप चांगलं आहे की, टीम इंडिया पराभूत झाली. भारत जिंकला असता तर खूपच वाईट झालं असतं”, असं अब्दुल रझ्झाक व्हायरल क्लिपमध्ये म्हणाला आहे.
“उपांत्य फेरीत त्यांनी 400 धावा केल्या. तर दुसऱ्या संघाने 350 धावा केल्या. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत 220-230 धावा केल्या. त्यानंतर अंतिम फेरीत 240 धावा केल्या. म्हणजेच काहीतरी चुकीचं घडलं आहे. त्यांनी दोन्ही संघांना पूरक असेल अशा खेळपट्टी, वातावरण तयार केलं पाहीजे. कोहलीने 100 धावा केल्या असत्या तर टीम इंडिया वनडे वर्ल्डकप जिंकला असता.”, असं अब्दुल रझ्झाक म्हणाला.
Abdul Razzaq forgot to tell India have also won 8 WC games vs PAK across conditions by cheating. #INDvAUSFinal @GeoTvNews #CricketWorldCup2023 pic.twitter.com/1I8QpGeg0l
— 𝐂𝐫𝐢𝐭𝐢𝐜 𝐑𝐚𝐣𝐚 (@kirikraja) November 23, 2023
पाकिस्तानमधून वनडे वर्ल्डकप स्पर्धेबाबत रोज काही ना काही वक्तव्य समोर येत आहेत. माजी क्रिकेटपटून हसन रझा याचं वक्तव्यही चांगलंच गाजलं होतं. आयसीसी आणि बीसीसीआय टीम इंडियाच्या खेळाडूंना वेगळा बॉल देत असल्याची टीका केली होती. त्यामुळे भारताच्या वेगवान गोलंदाजांना मदत झाली होती.तर हरभजन सिंग इस्लाम स्वीकारणार होता, असं वक्तव्य इंजमाम उल हक याने केलं होतं. त्याला कडक शब्दात हरभजन सिंगने उत्तर दिलं होतं.