4,WD,6,6,6,6,1..! शेवटच्या षटकात इतकं करूनही भारताचा युएईकडून 1 धावेने पराभव, Video
हाँगकाँग सुपर 6 स्पर्धेतून भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अवघ्या एका धावेने भारताला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. भारताच्या गटातून पाकिस्तान आणि युएईने पुढच्या फेरीत स्थान मिळवलं आहे. पण शेवटच्या षटकातील थरार वाचून पराभवाबाबत विचार करण्यास भाग पडेल.
हाँगकाँग सुपर 6 स्पर्धेत भारत आणि युएई हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा होता. पण या सामन्यात युएईकडून एका धावेने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युनाईटेड अरब इमिरात अर्थात युएईने 6 षटकात 5 गडी गमवून 130 धावा केल्या आणि विजयासाठी 131 धावांचं आव्हान दिलं. भारताला हे आव्हान काही गाठता आलं नाही. भारताने 4 गडी गमवून 129 धावा केल्या आणि एका धावेने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताला या स्पर्धेच्या पुढच्या फेरीत जाण्यासाठी युएईविरुद्ध विजय खूपच महत्त्वाचा होता. पण या पराभवामुळे भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताच्या गटातून पाकिस्तान आणि युएई हे संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. शेवटचं षटक एकदम धाकधूक वाढवणारं राहिलं. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 32 धावांची गरज होती. भारताकडून स्टूअर्ट बिन्नी स्ट्राईकवर होता. पण भारताला विजयासाठी 32, ड्रॉसाठी 31 धावांची गरज होती. पण भारताने 30 धावा केल्या.
पहिल्या चेंडूवर स्टुअर्टने चौकार मारला. त्यानंतर दुसरा चेंडू वाइड टाकल्याने एक अतिरिक्त धाव मिळाली. दुसऱ्या चेंडू परत टाकल्यानंतर षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर षटकार आणि पाचव्या चेंडूवर षटकार मारला. त्यामुळे एका चेंडूत विजयासाठी 3 धावा अशी स्थिती आली. तर सामना बरोबरीत सोडवण्यासाठी दोन धावांची गरज होती. पण स्टूअर्ट बिन्नीला शेवटच्या चेंडूवर फक्त एक धाव घेता आली आणि भारताचा एका धावेने पराभव झाला. खरं तर हा सामना सोडून दिल्यातच जमा होता. पण स्टूअर्ट बिन्नीने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली.
ICYMI: Stuart Binny almost took India over the finish line in a last over thriller against the UAE 😱#HongKongSixesonFanCode #ItsRainingSixes pic.twitter.com/zoEFOjG5mp
— FanCode (@FanCode) November 2, 2024
युएईकडून खालिद शाहने 10 चेंडूत 6 षटकार आणि 1 चौकार मारत 42 धावा केल्या. तर झहूर खानने 11 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 37 धावांची खेळी केली. असिफ खान 0, मुहम्मद झुहैबने 17, संचित शर्माने 12 आणि अकिफ राजाने 10 धावा केल्या. भारताकडून मनोज तिवारीने सर्वात महागडं षटक टाकलं आणि एका षटकात 34 धावा दिल्या. तर धावांचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली. स्टूअर्ट बिन्नीने 11 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. रॉबिन उथप्पाने 10 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या.
दोन्ही संघ
भारत : रॉबिन उथप्पा (कर्णधार), मनोज तिवारी, भरत चिपली, केदार जाधव, स्टूअर्ट बिन्नी आणि शहाबाझ नदीम
युएई : असिफ खान (कर्णधार), खालिद शाह, मुहम्मद झुहैब, संचित शर्मा, अकिफ राजा, झहूर खान