मुंबई : टीम इंडियाने भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा करण्याचं सत्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही कायम ठेवलं आहे. गेल्या दहा वर्षात भारतीय संघाला एकही आयसीसी चषक जिंकता आलेला नाही. त्यामुळे पराभूत मानसिकतेमुळे क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी आतापासूनच खलबतं सुरु झाली आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023- 2025 साठी भारतीय संघ सहा कसोटी मालिका खेळणार आहे. या सामन्यातील पहिला कसोटी टूर वेस्ट इंडिजमध्ये जुलै 2023 मध्ये असणार आहे. 12 जुलैपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना 12 जुलै ते 16 जुलै आणि दुसरा कसोटी सामना 20 जुलै ते 24 जुलै दरम्यान असणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत तीन कसोटी मालिका विदेशात, तर तीन कसोटी मालिका भारतात खेळणार आहे. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ जाणार आहे. तर इंग्लंडसोबत 5 कसोटी सामन्यांची, बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची आणि न्यूझीलंडविरूद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका भारतात खेळणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून आता नव्या खेळाडूंना संघात स्थान दिलं जाणार आहे. रोहित शर्माच्या फिटनेस पाहता आता त्याला संघात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे. 2021-2023 मध्ये रोहित शर्मा 18 पैकी 8 कसोटी सामने खेळला नव्हता. त्यात तो आता 36 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी संघात यशस्वी जयस्वाल किंवा अभिमन्यू ईश्वरन यांना संधी मिळू शकते.
चेतेश्वर पुजाराचाही पत्ता कापला जाऊ शकतो. त्याच्याऐवजी संघात ऋतुराज गायकवाड किंवा सरफराज खानला संधी मिळू शकते. दुसरीकडे, विराट कोहलीची जागा भरून काढणं सोपं नाही. त्यामुळे ही जागा भरण्यासाठी अधूनमधून श्रेयस अय्यर, केएल राहुल किंवा सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते.
उमेश यादवची कामगिरी एकदमच निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे त्याऐवजी संघात अर्शदीप सिंग किंवा मुकेश कुमारला संधी मिळण्याची शक्यता आहे. आर. अश्विनचा जागा भरून काढणं देखील सोपं नाही. त्यामुळे त्याला दोन वर्षे आणखी संधी मिश शकते.