IND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर सीरीज सुरु होण्यासाठी आता फक्त चार दिवस उरले आहेत. नागपूरमध्ये सीरीजमधला पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन टीम सध्या बंगळुरुमध्ये सराव करतेय. सोमवारी ऑस्ट्रेलियन टीम नागपूरला रवाना होईल. पण नागपूरमध्ये दाखल होण्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसलाय. टीमचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडला दुखापत झालीय. त्यामुळे तो पहिल्या कसोटीत खेळणार नाहीय. आपल्या टॉप वेगवान गोलंदाजाशिवाय खेळणं, ऑस्ट्रेलियासाठी सोपं नसेल.
कधी दुखापत झाली?
मागच्या महिन्यात सिडनी टेस्ट दरम्यान हेजलवूडच्या पायाला दुखापत झाली होती. बंगळुरुमध्ये टीमच्या ट्रेनिंग कॅम्पमध्य हेजलवूड फार सक्रिय दिसला नाही. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज हेजलव़ूडची दुखापत अजून पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळेच टीम मॅनेजमेंटने त्याला पहिल्या टेस्टमध्ये संधी न देण्याचा निर्णय घेतलाय.
वेळेत रिकव्हरी नाही झाली
हेजलवूड शिवाय टीमचे दुसरे वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि ऑलराऊंडर कॅमरुन ग्रीनही दुखापतीने त्रस्त आहेत. रविवारी सकाळी हेजलवूडला त्याच्या दुखापतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्याने सांगितलं की, “पहिल्या कसोटीत माझं खेळणं निश्चित नाहीय. दुसऱ्या कसोटीचा निर्णयही नंतर होईल. मी सध्या वर्कलोड मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय. मी चांगल्या पद्धतीने रिकव्हरी करु शकलेलो नाही. मी आधी थोडी फलंदाजी आणि नंतर नागपूरमध्ये जाऊन गोलंदाजी करण्याचा विचार केला होता”
ग्रेग चॅपल यांना वाटतं, ऑस्ट्रेलिया जिंकेल
ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामन्यांची ही सीरीज जिंकू शकते असं महान फलंदाज ग्रेग चॅपल यांना वाटतं. ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराहसारखे प्लेयर दुखापतीमुळे खेळत नाहीयत. त्यामुळे भारतीय टीम कमकुवत वाटतेय. पंत मागच्यावर्षी कार अपघातात जखमी झाला आहे. तो पुढेच आठ ते नऊ महिने क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाहीय. पाठदुखीचा सामना करणाऱ्या बुमराहची पहिल्या दोन कसोटीसाठी टीममध्ये निवड झालेली नाही.
मग त्याच्याजागी कोण?
जोश हेजलवडू बाहेर गेल्यामुळे त्याच्याजागी आता स्कॉट बोलँडला परदेश भूमीवर पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळू शकते. बोलँड ऑस्ट्रेलियासाठी सहा कसोटी सामने खेळलाय. “स्कॉटीने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर फ्लॅट विकेटवर भरपूल बॉलिंग केलीय. चेंडू जास्त स्विंग होत नव्हता. आपल्याला मेहनत करावी लागेल, हे त्याला माहित आहे” असं हेजलवूड बोलँडबद्दल बोलताना म्हणाला. स्कॉटशिवाय लान्स मॉरिसचाही एक पर्याय आहे. त्याला ऑस्ट्रेलियाकडून डेब्युची संधी मिळू शकते.