टीम इंडिया लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मायदेशात 3-0 ने न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलिया दौरा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे. भारताला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 असा विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे भारताची या दौऱ्यात खरी कसोटी असणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कॅप्टन रोहित पहिल्या 2 कसोटी सामन्यात वैयक्तिक कारणामुळे खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. अशात रोहितच्या अनुपस्थितीत यशस्वी जयस्वालसोबत ओपनिंग कोण करणार? असाही प्रश्न उपस्थित होतो. रोहितच्या या एका जागेसाठी 3 दावेदार आहेत.
या मालिकेआधी इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात 2 अनऑफीशियल कसोटी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताला ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात पराभूत व्हावं लागलं. तर दुसरा सामना हा 7 नोव्हेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. त्याआधी इंडिया ए टीममध्ये केएल राहुल आणि ध्रुव जुरेल या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात रोहितच्या जागी केएल राहुल आणि ध्रुव जुरेल या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच रोहितच्या जागेसाठी अभिमन्यू ईश्वरन याच्याही नावाची चर्चा आहे.
अभिमन्यू ईश्वरन याने देशातंर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. इश्वरनला त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. तसेच केएल राहुल ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध ओपनिंग करणार असल्याचं म्हटलं जात आहे. केएलने ओपनर म्हणून 75 डावांमध्ये 39.94 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे आता रोहितच्या जागी तिघांपैकी कुणाला संधी मिळणार? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.