हैदराबाद | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हा गुरुवार 25 जानेवारीपासून हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचे 2 स्टार खेळाडू या सामन्यात नसतील. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड टीम इंडिया विरुद्ध पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल. बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंड रोहितसेनेवर वरचढ होण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. या सामन्यात विराट कोहली आणि मोहम्मद शमी हे दोघे खेळणार नाहीत. आता या सामन्याची खेळपट्टी कशी आहे, या मैदानाचा इतिहास काय आहे, हे जाणून घेऊयात.
इंग्लंडने भारतात टीम इंडिया विरुद्ध अखेरची कसोटी मालिका ही 12 वर्षांआधी जिंकली होती. उभयसंघात एकूण 4 सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. इंग्लंडने ही मालिका 2-1 ने जिंकून टीम इंडियाला घरात घुसून पराभूत केलं. मात्र त्यानंतर 2 वेळा भारतात आलेल्या इंग्लंडला टीम इंडियाने पराभूत करुन माघारी पाठवलं.
इंग्लंडला 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिका जिंकण्याची संधी आहे. कारण टीम इंडियाची बॅटिंग लाईनअप ही फारशी तगडी नाही. टीम इंडियात अनेक युवा खेळाडू आहेत. याचा फायदा इंग्लंडला घेता येईल. मात्र टीम इंडियाची बॉलिंग लाईनअप तोडीसतोड आहे. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना जरा जपूणच रहावं लागेल. टीम इंडियाच्या ताफ्यात अनुभवी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यासारखे एकसेएक पर्याय आहेत.
सामन्याआधी हैदराबादमधील या खेळपट्टीचा अंदाज बांधणं जरा अवघडच आहे. आतापर्यंत इथे मोजकेच कसोटी सामने झाले आहेत. त्या सामन्यात खेळपट्टी सपाट होती, याचाच अर्थ खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल ठरेल.
आतापर्यंत हैदराबादमधील या स्टेडियममध्ये एकूण 5 कसोटी सामने झाले आहेत. त्यापैकी 4 सामन्यांचा निकाल लागलाय. या 4 पैकी 2 वेळा पहिले आणि 2 वेळा नंतर (चौथ्या डावात) बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर एक सामना हा अनिर्णित राहिला आहे.
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.