मुंबई: लॉर्ड्स (Lords) मधील दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडकडून (IND vs ENG) दारुण पराभव झाला. इंग्लंडने मोठ्या अंतराने तब्बल 100 धावांनी भारतीय संघाला पराभूत केलं. या विजयासह इंग्लंडने मालिकेत कमबॅक केलं. भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली होती. पण आता इंग्लंडच्या संघाने मालिकेत बरोबरी साधलीय. आता रविवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातून मालिकेचा निकाल लागेल. पराभवानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) संघातील खेळाडूंची शाळा घेतली. त्याने टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यास सांगितलं. स्वत: रोहित शर्मा या सामन्यात खातही उघडू शकला नाही. टॉस जिंकल्यानंतर रोहितने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यांनी इंग्लंडला 246 धावांवर रोखलं. पण त्याच विकेटवर भारतीय फलंदाज अपयशी ठरले.
“आम्ही चांगली गोलंदाजी केली. पण तुम्हाला सामना जिंकायचा असेल, तर झेल घेणं आवश्यक आहे”, असं रोहित म्हणाला. 40 व्या षटकात शमीच्या चौथ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने मिड ऑनवर विलीचा झेल सोडला. विली त्यावेळी 24 धावांवर खेळत होता. त्याने 41 धावा केल्या. “आम्ही चांगली गोलंदाजी केली. पण चांगली फलंदाजी करु शकलो नाही. आमच्याकडे फलंदाजांची मोठी फळी आहे. पण टॉप ऑर्डरने चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. असं झालं असतं, तर आम्ही आज पुढे असतो” असं रोहित म्हणाला.
“खेळपट्टी नंतर फलंदाजीसाठी अनुकूल होत जाईल, असं वाटलं होतं. पण सुरुवातीपासूनच या पीच मध्ये गोलंदाजांसाठी काहीतरी होतं” असं रोहित म्हणाला. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताची टॉप ऑर्डर कोसळली. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली आणि ऋषभ पंत फ्लॉप ठरले. रोहित 10 चेंडू खेळला पण खातही उघडू शकला नाही. शिखर धवनने 26 चेंडूत 9 धावा केल्या. कोहलीने 25 चेंडूत 16 धावा. पंत 5 चेंडू खेळून शुन्यावर आऊट झाला. भारतासाठी हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 29, 29 धावा केल्या.