IND vs NZ Semi Final : उपांत्य फेरीत भारत विरुद्ध न्यूझीलंड! सामन्यापूर्वी कर्णधार केन विल्यमसनने केलं मोठं विधान
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध न्यूजीलंड सामना होईल यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. पण पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्याची औपचारिकता बाकी आहे. तत्पूर्वी न्यूझीलंड खेळाडूंच्या चेहऱ्याव उपांत्य फेरी गाठल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. केन विल्यमसननेही आपलं ध्येय स्पष्ट केलं आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पुन्हा एकदा भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना पाहायला मिळणार आहे. 2019 वर्ल्डकप स्पर्धेतही दोन्ही संघ आमनेसामने आले होते. पण त्यावेळेस न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला होता. महेंद्रसिंह धोनी धावचीत झाल्यानंतर सामना न्यूझीलंडच्या पारड्यात गेला होता. तसेच टेस्ट चॅम्पियनशिप 2021 च्या अंतिम फेरीतही न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धची लढत वाटते तितकी सोपी नाही. आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने कायमच भारताची वाट अडवली आहे. भारताने साखळी फेरीत न्यूझीलंडला पराभूत करत गेल्या 20 वर्षांपासूचा पराभवाचा डाग पुसून काढला आहे. पण याच स्पर्धेत पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे मैदानात हा सामना होणार आहे. पाकिस्तानचा सामना अजून शिल्लक असल्याने न्यूझीलंडला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं नाही. पण कर्णधार केन विल्यमसन याने आपला ध्येय स्पष्टपणे सांगितलं आहे.
काय म्हणाला केन विल्यमसन?
“आम्ही श्रीलंकेविरुद्ध अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. खेळपट्टी नंतर स्लो झाली होती. सुरुवातीला झटपट गडी बाद केल्याचा आम्हाला फायदा झाला. आता पुढच्या सामन्यापूर्वी आम्हाला सुट्ट्यांचा आनंद लुटता येणार आहे. पण कुठे जायचं हे काय ठरलं नाही. पण आशा आहे की सर्व काही आमच्या बाजूने असेल. उपांत्य फेरी पोहोचणं खरंच मोठी गोष्ट आहे. आम्ही पुढचं आव्हान स्वीकारण्यास तयार आहोत.”, असं न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने म्हंटलं आहे. त्यामुळे भारताला न्यूझीलंडशी सामना करताना काळजी घ्यावी लागणार आहे, हे मात्र खरं..
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या 21 व्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. न्यूझीलंडने 50 षटकात सर्वबाद 273 धावा केल्या आणि विजयासाठी 274 धावांचं आव्हान दिलं. भारताने हे आव्हान 48 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात विराट कोहलीने 95, रोहित शर्माने 46 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 39 धावा केल्या होत्या. तर मोहम्मद शमीने 5 गडी बाद केले होते.
दोन्ही संघाचे खेळाडू
न्यूझीलंड : डेवॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डेरिल चॅपमॅन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम, मिचेल सँटनर, टिम साऊथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स,ईश सोढी, विल यंग.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.