IND VS SL: धर्मशालात होशियार…! सर्व सामन्यांमध्ये टीम इंडिया फ्लॉप, श्रीलंकेनेही धूळ चारलीय
श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात (India vs Sri Lanka) टीम इंडियाने पाहुण्यांची धुळधाण उडवली. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने 62 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात (India vs Sri Lanka) टीम इंडियाने पाहुण्यांची धुळधाण उडवली. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने 62 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, आता टीम इंडियासमोरचं आव्हान मोठं आहे. कारण टीम इंडियाला आता त्या मैदानावर सामना खेळायचा आहे जिथे ते कधीही जिंकू शकले नाहीत. यासोबतच श्रीलंकेनेही टीम इंडियाला (Team India) तिथे धूळ चारली आहे. T20 मालिकेतील पुढील सामना धर्मशाला (India vs Sri Lanka, 2nd T20I) येथे खेळवला जाणार आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावर शनिवारी हा सामना होणार आहे.
धौलाधरच्या हिमशिखरांनी वेढलेले हे मैदान फलंदाजांसाठी अनेकदा अडचणीचे ठरते. येथील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर गोलंदाजांना स्विंग मिळते आणि त्याचा फटका टॉप ऑर्डरला सहन करावा लागतो. जसे 2017 आणि 2015 मध्ये टीम इंडियासोबत घडले होते. 2015 मध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात 199 धावा केल्या होत्या, मात्र असे असतानाही पराभव पत्करावा लागला होता. शिवाय या मैदानावरील वनडे सामन्यातही श्रीलंकेने टीम इंडियाचा पराभव केला आहे.
श्रीलंकेसमोर टीम इंडियाचं सरेंडर
भारत आणि श्रीलंका यांच्यात धर्मशाला येथे 10 डिसेंबर 2017 रोजी सामना खेळवण्यात आला होता. या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा डाव अवघ्या 112 धावांत गुंडाळला गेला आणि श्रीलंकेने केवळ 20.4 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. म्हणजे श्रीलंकेने टीम इंडियाचा 176 चेंडूत पराभव केला, हा यजमानांचा मोठा पराभव होता. धर्मशालामध्ये त्या दिवशी टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. पहिल्या 5 फलंदाजांना दुहेरी आकडादेखील गाठता आला नाही. विशेष म्हणजे त्या सामन्यात रोहित शर्मा कर्णधार होता.
रोहित-धवन, अय्यर सगळेच फेल
धर्मशालामध्ये श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलने टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला शरणागती पत्करण्यास भाग पाडले होते. कर्णधार रोहित शर्माला केवळ 2 धावा करता आल्या. शिखर धवन, दिनेश कार्तिक यांना खातेही उघडता आले नाही. मनीष पांडेही 2 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयस अय्यरही 9 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्यालाही केवळ 10 धावांचे योगदान देता आले. टीम इंडियाने अवघ्या 29 धावांत 7 विकेट गमावल्या. त्यानंतर धोनीने शानदार 65 धावा करत टीम इंडियाची लाज राखली आणि धावसंख्या 100 च्या पुढे नेली. टीम इंडियाला 38.2 षटकात केवळ 112 धावा करता आल्या आणि त्यानंतर मोठा पराभव झाला. त्यामुळेच शनिवारी होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाला जुना पराभव लक्षात ठेवून श्रीलंकेला हरवून मालिका काबीज करण्यासाठी सर्वोत्तम खेळ दाखवावा लागणार आहे.
इतर बातम्या
IND VS SL: भारताला हरवण्यासाठी श्रीलंकेने निवडला मजबूत संघ, कसोटीसाठी टीमची घोषणा