नवी दिल्ली: धर्मशाळा (Dharamshala) येथे सुरु असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेने सावध सुरुवात केली होती. पहिल्या पाच षटकात भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar kumar) आणि जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) टिच्चून मारा केला. पथुम निसांका आणि दानुष्का गुणतिलका ही सलामीची जोडी खूप सावध फलंदाजी करत होती. पण त्यानंतर त्यांनी हळहळून धावगती वाढवली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. रवींद्र जाडेजाने पहिले यश मिळवून दिले. त्याने धुलाई करणाऱ्या दानुष्का गुणतिलका आऊट केलं. 29 चेंडूत त्याने 38 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. जाडेजाने त्याला वेंकटेश अय्यरकरवी झेलबाद केले. त्यानंतर ठराविक अंतराने श्रीलंकेचे फलंदाज बाद होत होते.
15 व्या षटकापर्यंत सामन्यावर भारताचे नियंत्रण वाटत होते. श्रीलंका मोठी धावसंख्या उभारणार नाही असं चित्र होतं. पण सलामीवीर पथुम निसांका (75) धावा आणि दासुन शानकाच्या (47) धावांच्या खेळीने हे चित्रच बदलून टाकलं. निसांकाने बाद होण्यापूर्वी कॅप्टन शानकासोबत पाचव्या विकेटसाठी 58 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. 53 चेंडूत (75) धावा करणाऱ्या पथुम निसांकाला भुवनेश्वर कुमारने पायचीत पकडलं. त्याच्याखेळीत 11 चौकार होते. कॅप्टन दासुन शानकाने 19 चेंडूत नाबाद (47) धावा फटकावल्या. शानकाने दोन चौकार, पाच षटकार लगावले.
शेवटच्या चार षटकात श्रीलंकेच्या निसांका-शानका जोडीने तुफान फटकेबाजी केली. त्यांनी चार षटकात 72 धावा चोपल्या. हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात 23 धावा काढल्या. तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात 52 धावा दिल्या.