IND vs WI 3rd T20, LIVE Score: भारताची वेस्ट इंडिजवर 17 धावांनी मात, क्लीन स्विपसह टी-20 रँकिंग्समध्ये पहिल्या स्थानी
India vs West Indies 1st T20 Live Cricket Score and Updates in Marathi - भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मालिकेतला तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना खेळवला जात आहे.
मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज (INDvsWI) यांच्यात आज शेवटचा तिसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. भारताने टी-20 मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारताच्या दृष्टीने औपचारिकता आहे. पण वेस्ट इंडिज आजचा सामना जिंकून किमान प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करेल. वनडे सीरीजप्रमाणे टी-20 मध्येही क्लीन स्वीप करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा हा निर्णय विंडीच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. तिसऱ्याच षटकात भारताने ऋतुराज गायकवाडची (4) विकेट गमावली. त्यानंतर 9.4 षटकात भारताची 3 बाद 66 अशी अवस्था झाली होती. मात्र पुढे सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यरने भारताचा डाव सावरला. सूर्यकुमार यादवने 31 चेंडूत 65 धावांची धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. त्यात 7 षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. तर वेंकटेशने 19 चेंडूत 35 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 41 चेंडूत 91 धावांची भागीदारी करत भारताला 184 धावांपर्यंत मजल मारुन दिली.
दरम्यान, 185 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात विंडीजने पहिली विकेट गमावली. त्यानंतर तिसऱ्या षटकात दीपक चाहरने विंडीजला आणखी एक धक्का दिला. त्यानंतर निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि रोव्हमन पॉवेलने काही वेळ झुंज दिली मात्र कोणत्याही कॅरेबियन खेळाडूला मोठी खेळी करत विंडीजला विजय मिळवून देता आला नाही. विंडीजकडून निकोलस पूरनने 47 चेंडूत 61 धावांची खेळी केली. शेफर्ड (29) आणि पॉवेलने (25) थोडंफार योगदान दिलं. मात्र भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत अखेरपर्यंत सामन्यावरील पकड सुटू दिली नाही. भारताकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3, दीपक चाहरने 2, शार्दुल ठाकरूने 2, रवी बिष्णोईने 2 बळी घेतले.
दरम्यान, या सामन्यातील विजयासह भारताने वेस्ट इंडिजवर 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्विप विजय मिळवला आहे. तसेच भारताने आयसीसी टी-20 रॅकिंग्समध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन
ऋतुराज गायकवाड, इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, आवेश खान, रवी बिष्णोई
वेस्टइंडीजची प्लेइंग इलेवन
शाय होप, काइल मेयर्स, निकोलस पूरन, रॉस्टन चेज, रॉवमॅन पॉवेल, कायरन पोलार्ड, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, फिन अॅलन, डी. ड्रेक्स, एच. वॉल्श
Key Events
भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात संघात कोणतेही बदल केले नव्हते. पण मालिकेत विजयी आघाडी घेतल्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने चार बदल केले आहेत. आज महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संघात संधी देण्यात आली आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धा आणि मागच्या आयपीएल सीजनमध्ये सर्वाधिक धावा करुनही ऋतुराजला संधी मिळत नव्हती. गेले दोन तीन महिने तो बेंचवर बसून होता. अखेर आज त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. तसेच नाणेफेक झाल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने इयन बिशप यांच्यासोबत बोलताना सांगितले की, आजच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन दोघे सलामीला उतरतील. तर ऋतुराजसाठी रोहित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.
गोलंदाजांमध्ये आजच्या सामन्यात आवेश खान आणि शार्दुल ठाकूर या दोन खेळाडूंना संधी मिळाली आहे. दुसऱ्या सामन्यात शार्दुलला विश्रांती देण्यात आली होती. सातत्याने क्रिकेट खेळत असलेल्या भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलला विश्रांती देऊन आवेश खान आणि शार्दुल ठाकूर या दोन वेगवान गोलंदाजांना आज प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज आवेश खान आजच्या सामन्याद्वारे टीम इंडियात पदार्पण करत आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
वेस्ट इंडिजचा 9 वा गडी बाद, सामना भारताच्या हातात
वेस्ट इंडिजने 9 वी विकेट गमावली आहे. शार्दुल ठाकूरने डॉमिनिक ड्रेक्सला 4 धावांवर असताना रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. रोहितने अप्रतिम झेल टिपत शार्दुलला दुसरं यश मिळवून दिलं.
-
वेस्ट इंडिजचा 8 वा फलंदाज माघारी, रोमारियो शेफर्ड 29 धावांवर बाद
हर्षल पटेलने भारताला 8 वी विकेट मिळवून दिली आहे. त्याने रोमारियो शेफर्डला 29 धावांवर असताना रोहित शर्माकरवी झेलबाद केलं.
-
-
वेस्ट इंडिजच्या उरल्यासुरल्या आशां संपुष्टात, शार्दुल ठाकूरकडून पूरनची शिकार
शार्दुल ठाकूरने 18 व्या षटकात सामन्याचा रंग बदलला आहे. वेस्ट इंडिजचा भरवशाचा फलंदाज निकोलस पूरनची शिकार करुन शार्दुलने सामना भारताच्या बाजूने झुकवला आहे. पूरन 61 धावांवर इशान किशनकरवी झेलबाद झाला.
-
वेस्ट इंडिजला सहावा झटका, चेसला हर्षल पटेलने केले क्लीन बोल्ड
वेस्ट इंडिजला सहावा झटका बसला आहे, कारण चेसला हर्षल पटेलने केले क्लीन बोल्ड, (वेस्ट इंडिज 100 रनवर 6 बाद)
-
वेस्ट इंडिजचा पाचवा गडी माघारी, जेसन होल्डर तंबूत परतला
वेंकटेश अय्यरच्या बॉलिंगवर फटका मारताना जेसन होल्डरचा कॅच श्रेयस अय्यरने पकडा
-
-
वेस्ट इंडिजचा चौथा गडी माघारी, कर्णधार पोलार्ड 5 धावांवर बाद
भारताला चौथं यश मिळालं आहे. वेंकटेश अय्यरने कायरन पोलार्डला रवी बिष्णोईकरवी झेलबाद केलं. (वेस्ट इंडिज 83/4)
-
वेस्ट इंडिजला तिसरा धक्का, आक्रमक रोव्हमन पॉवेल 25 धावांवर बाद
वेस्ट इंडिजला तिसरा धक्का बसला आहे, आक्रमक रोव्हमन पॉवेल 25 धावांवर बाद झाला. हर्षल पटेलने त्याला शार्दुल ठाकूरकरवी झेलबाद केलं.
-
विंडीजचा दुसरा गडी माघारी, शाय होप 8 धावांवर बाद
भारताला दुसरं यश मिळालं आहे. दीपक चाहरने वैयक्तिक दुसऱ्याच (सामन्यातील तिसऱ्या) षटकात दुसरी विकेट मिळवली. त्याने शाय होपला यष्टीरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केलं.
-
भारताला पहिलं यश, काईल मेअर्स 6 धावांवर बाद
दीपक चाहरने भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे. त्याने काईल मेअर्सला यष्टीरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केलं.
-
भारताचा 5 वा गडी माघारी, सूर्यकुमार यादव 65 धावांवर बाद
अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार यादव बाद झाला आहे. त्याने 31 चेंडूत 65 धावांची खेळी केली. रोमारियो शेफर्डच्या गोलंदाजीवर रोव्हमन पॉवेलने त्याला झेलबाद केलं.
-
5 व्या षटकारासह सूर्यकुमार यादवचं अर्धशतक
5 व्या षटकारासह सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावलं आहे. सूर्यकुमारने 28 चेंडूत 5 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 53 धावा फटकावल्या
-
सूर्याचा तिसरा षटकार
16 व्या षटकात सूर्यकुमारने तिसरा षटकार लगावला. डॉमिनिक ड्रेक्सच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने उत्तुंग षटकार लगावत 6 धावा वसूल केल्या.
-
भारताचा चौथा फलंदाज माघारी, रोहित शर्मा 7 धावांवर बाद
भारताने चौथी विकेट गमावली आहे. कर्णधार रोहित शर्मा 15 चेंडूत 7 धावांवर बाद झाला. डॉमिनिक ड्रेक्सने रोहितला त्रिफळाचित केलं. (भारत 93/4)
-
सूर्यकुमारचा दुसरा षटकार
13 व्या षटकात सूर्यकुमारने दुसरा षटकार लगावला. हेडन वॉल्शच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने उत्तुंग षटकार लगावत 6 धावा वसूल केला.
-
सूर्यकुमारचा षटकार
भारताच्या या डावातला पहिला षटकार सूर्यकुमार यादवने लगावला आहे. 11 व्या षटकात त्याने हेडन वॉल्शच्या गोलंदाजीवर शानदार षटकार लगावला. (भारत 78/3)
-
भारताचा तिसरा फलंदाज माघारी, इशान किशन 34 धावांवर बाद
भारताने तिसरी विकेट गमावली आहे. रॉस्टन चेजने किशनला त्रिफळाचित केलं. किशनने 31 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 35 धावा लगावल्या. (भारत 66/3)
-
भारताला दुसरा धक्का, श्रेयस अय्यर 25 धावांवर बाद
भारताने दुसरी विकेट गमावली आहे. श्रेयस अय्यर 25 धावांवर माघारी परतला. हेडन वॉल्शने श्रेयसला जेसन होल्डरकरवी झेलबाद केलं. त्याने 4 चौकारांच्या मदतीने 16 चेंडूत 25 धावांची खेळी केली. (भारत 62/2)
-
किशन-श्रेयसची फटकेबाजी, 7 षटकात अर्धशतक
गायकवाड बाद झाल्यानंतर इशान किशन (28) आणि श्रेयस अय्यरने (17) फटकेबाजी सुरुच ठेवली आहे. दोघांनी 7 षटकात धावफलकावर 42 धावा झळकावल्या आहेत. भारतीय फलंदाजांनी या 7 षटकात 9 चौकार लगावले आहे. (भारत 51/1)
-
भारताला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड 4 धावांवर बाद
भारताने पहिली विकेट गमावली आहे. 8 चेंडूत 4 धावा करुन ऋतुराज गायकवाड माघारी परतला. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर ऋतुराज काईल मेयर्सच्या हाती झेल देत माघारी परतला. (भारत 10/1)
-
ऋतुराज-किशनचे चौकार
पहिल्या षटकात इशान किशनने जेसन होल्डरला आणि दुसऱ्या षठकात ऋतुराज गायकवाडने रोमारियो शेफर्डला शानदार चौकार लगावले. (भारत 9/0)
-
भारताच्या डावाला सुरुवात, ऋतुराज-किशन मैदानात
भारताच्या डावाला सुरुवात झाली आहे. ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड सलामीला खेळणार आहेत.
-
नाणेफेक जिंकून कायरन पोलार्डचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
दोन्ही संघ मैदानात दाखल
तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी दोन्ही संघ ईडन गार्डन्सवर दाखल, थोड्याच वेळात नाणेफेक होणार
All clear now at the Eden Gardens and the two teams have arrived for the third and final T20I.
Win the toss and ?@Paytm #INDvWI pic.twitter.com/ZiOmShbjY2
— BCCI (@BCCI) February 20, 2022
Published On - Feb 20,2022 6:13 PM