डे नाईट कसोटी सामना सुरु असताना भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळणार वनडे, मालिकेत 0-1 ने पिछाडीवर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून आता भारतीय संघ डे नाईट कसोटीसाठी सज्ज आहे. दुसरीकडे, भारताचा ऑस्ट्रेलियाशी दुसरा वनडे सामना होणार आहे.
भारतीय पुरुष संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात भारताने पहिला कसोटी सामना जिंकला आहे. तसेच पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. . दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा परतल्याने त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा आली आहे. डे नाईट कसोटीत भारताची कठीण परीक्षा असणार आहे. कारण या सामन्यावर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित अवलंबून आहे. एडिलेड मागच्या वेळी झालेल्या डे नाईट कसोटी भारताचा पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाने भारताने 8 विकेट्सने पराभूत केलं होतं. दुसरीकडे, भारतीय पुरुष संघासोबत महिला संघही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. भारतीय महिला संघाचं पहिल्या सामन्यातच पानिपत झालं आहे. त्यामुळे वनडे मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे दुसरा सामना भारतीय महिला संघासाठी खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात पराभव झाला तर मालिका हातून जाणार आहे. त्यामुळे काहीही करून भारताला विजय मिळवावा लागणार आहे.
दरम्यान, कसोटी सामन्याचा तिसरा दिवस सुरु असताना हा सामना असणार आहे. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांना दोन सामने एकाच वेळी पाहण्याची संधी मिळणार आहे. डे नाईट कसोटी सामना पाच दिवस चालणं तसं फार कठीण असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण तीन दिवस चालेल अशी शक्यता आहे. त्यामुळे तिसरा दिवसच निर्णायक असणार आहे. दुसरा वनडे सामना ब्रिसबेनच्या एलन बॉर्डर मैदानात होणार आहे. हा सामना 8 डिसेंबरला भारतीय वेळेनुसार सकाळी 5.15 वाजता असणार आहे.
पहिल्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघाचा दारूण पराभव झाला आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव 34.2 षटकात 100 धावा करू शकला. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 5 गडी गमवून 16.2 षटकात पूर्ण केलं. दारूण पराभवानंतर भारतीय महिला संघाला कमबॅकचं आव्हान आहे.