INDIA Won T20 World Cup : हातातून गेलेला सामना या ठिकाणी फिरला, रोहितचा हा निर्णय ठरला फायद्याचा
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना धाकधूक वाढवणारा होता. प्रत्येक चेंडूला सामन्याचं चित्र बदलत होतं. एक क्षण असा आला होता की सामना पूर्णपणे दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकला होता. मात्र रोहित शर्माने एक निर्णय घेतला आणि सामन्याचा रंगच बदलला.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर भारतीय संघाने दुसऱ्यांदा नाव कोरलं आहे. वनडे वर्ल्डकप जेतेपदाचं स्वप्न भंगल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. रोहित शर्माच्या खांद्यावर टी20 वर्ल्डकप स्पर्धेची धुरा सोपवली. हा विश्वास रोहित सेनेने खरा ठरवून दाखवला. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या जोडीने भारतीय क्रीडारसिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. 11 वर्षानंतर आयसीसी चषकावर आपलं नाव कोरलं. मात्र एक क्षण असा आला होता की सामना हातून वाळूसारखा निसटत होता. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांची धाकधूक वाढली होती. त्यात 15 व्या षटकात तर सर्वच आशा संपुष्टात आल्या होत्या. कारण अक्षर पटेलच्या एका षटकात 24 धावा आल्या. हेन्रिक क्लासेनने अक्षरची धुलाई केली. त्यामुळे सामना 30 चेंडूत 30 धावा असा आला. त्यामुळे आता काही जिंकत नाही असंच वाटलं.
हार्दिक पांड्याची दोन षटकं, जसप्रीत बुमराहची 2 आणि अर्शदीप सिंगचं एक षटक बाकी होतं. रोहित शर्माने 16 वं षटक जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवलं. वर्ल्ड क्लास गोलंदाज असल्याने जरा घाबरून मिलर आणि क्लासेन जोडी खेळत होती. बुमराहने 16 व्या षटकात फक्त 4 धावा दिल्या आणि टीम इंडियाला सामन्यात ठेवलं. त्यानंतर हार्दिक पांड्याच्या हाती षटक सोपवलं. पहिल्याच चेंडूवर हार्दिकला क्लासेनची विकेट मिळाली आणि जीवात जीव आला. या षटकातही 4 धावा आल्या.
18 चेंडूत 22 धावांची आवश्यकता असताना जसप्रीत बुमराहाशिवाय पर्याय नव्हता. अखेर हे ब्रह्मास्त्र रोहित शर्माने काढलं आणि सामना इथेच जिंकलो. या षटकातील पहिले दोन चेंडू निर्धाव गेले. तिसऱ्या चेंडूवर मिलरने एक धाव घेत यानसेनला स्ट्राईक दिली. मग काय चौथ्या चेंडूवर त्याला तंबूत पाठवलं. पाचवा चेंडू निर्धाव आणि सहाव्या चेंडूवर एक धाव आली. या षटकात फक्त 3 धावा आल्या आणि भारताचा विजय पक्का झाला. जसप्रीत बुमराहने 4 षटकात 18 धावा देत दोन महत्त्वाचे गडी बाद केले.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.