Retirement : भारताच्या ‘या’ खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती, नक्की काय झालं?
Cricket Retirement : भारताच्या 31 वर्षीय वेगवान गोलंदाजाने क्रिकेटला अलविदा केला आहे. या खेळाडूने त्याच्या कारकीर्दीत 400 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या होत्या.
टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीत एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. तर उभयसंघात 14 ते 18 डिसेंबर दरम्यान गाबा, ब्रिस्बेन येथे तिसरा सामना खेळवण्यात येत आहे. अशात एका भारतीय वेगवान गोलंदाजाने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. या गोलंदाजाने त्याच्या व्यवसायिक क्रिकेट कारकीर्दीत एकूण 400 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच या खेळाडूने आयपीएलमध्येही धमाका केला आहे. मात्र गेली 4 वर्ष आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे या खेळाडूने सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली आहे.
भारतीय खेळाडू निवृत्त
अंकित राजपूत या 31 वर्षीय अनकॅप्ड भारतीय वेगवान गोलंदाजाने वयाच्या 31 व्या वर्षी क्रिकटला रामराम ठोकला आहे. अंकित देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करतो. अंकित नुकतंच झालेल्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या टप्प्यात सहभागी झाला होता. तसेच अंकितने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. अंकितने त्याचा आयीएलमधील अखेरचा सामना हा 2020 साली खेळला होता. तेव्हापासून तो संधी मिळेल याच प्रतिक्षेत होता.
“सर्वांचे आभार”
दरम्यान अंकितने इंस्टावर व्हीडिओद्वारे निवृत्ती जाहीर केली आणि भावना व्यक्त केल्यात. “मी भारतीय क्रिकेटमधून निवृ्त्त होत असल्याचं जाहीर करतो. क्रिकेट कारकीर्दीतील 2009-2024 हा माझ्या आयु्ष्यातील सर्वोत्तम काळ राहिला. मी बीसीसीआय, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन, कानपूर क्रिकेट असोसिएशन, आयपीएलमधील चेन्नई, कोलकाता, पंजाब, राजस्थान आणि लखनऊ या संघांनी मला दिलेल्या संधीसाठी आभारी आहे. माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक, फिजिओ डॉ सैफ नकवी, माझे प्रशिक्षक शशी सर आणि इतर सर्वांचे आभार. माझं स्वप्न प्रत्यक्षात खरं करण्यासाठी तुम्ही दिलेल्या योगदानासाठी धन्यवाद”, अशा शब्दात अंकितने साऱ्यांचे आभार मानले आहेत.
अंकित राजपूत याची क्रिकेट कारकीर्द
अंकित राजपूत त्याच्या कारकीर्दीत 80 फर्स्ट क्लास, 50 लिस्ट ए आणि 87 टी 20 सामने खेळला. अंकितने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 248, 71 आणि 105 विकेट्स घेतल्या. अंकितने आयपीएलमधील 29 सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत.