Video : पराभवाच्या मानसिकतेत असलेल्या दक्षिण अफ्रिकनं संघाचं भारतीय चाहत्यांनी जिंकलं मन, केलं असं काही
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर दक्षिण अफ्रिकन संघावरील चोकर्सचा डाग कायम राहिला. आयसीसी चषकात कायम पराभवाचं तोंड पाहणाऱ्या दक्षिण अफ्रिकन संघाच्या वाटेला पुन्हा एकदा निराशा आली. मात्र भारतीय चाहत्यांनी पराभवानंतर त्यांचं मनोबळ वाढवणारी कृती केली.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपदावर 17 वर्षानंतर भारतीय संघाने नाव कोरलं. 2007 साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने जेतेपद मिळवलं होतं. तेव्हा पाकिस्तानला पराभूत करून भारताने विजय मिळवला होता. आता 17 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 2024 स्पर्धेत भारताने जेतेपदावर नाव कोरलं. यावेळी दक्षिण अफ्रिकेला पराभवाची धूळ चारून भारताने विजय मिळवला. भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केलं आणि चषकावर नाव कोरलं. त्यामुळे आयसीसी टी20 वर्ल्डकप जिंकण्याचं दक्षिण अफ्रिकेचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आणि दक्षिण अफ्रिकेवर असलेला चोकर्सचा डाग कायम राहिला. मात्र भारतीय क्रिकेट चाहत्यांनी दक्षिण अफ्रिकेचं मनोबळ वाढेल अशी कृती केली आहे. मायदेशी परतणाऱ्या दक्षिण अफ्रिकन संघाचं कौतुक केलं. हॉटेलमधून बाहेर जाणाऱ्या बसजवळ भारतीय चाहत्यांनी गराडा घातला होता. यावेळी त्यांनी टाळ्या वाजून दक्षिण अफ्रिकन संघांच कौतुक केलं. खूप चांगले खेळले अशी दादही दिली. “आम्ही तुमच्यावर प्रेम करतो, दक्षिण अफ्रिका”, अशी घोषणाबाजी भारतीय क्रीडाप्रेमींनी केली.
अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 177 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दक्षिण अफ्रिकन संघाला 20 षटकात 8 गडी गमवून 169 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला आणि जेतेपदावर नाव कोरलं. दक्षिण अफ्रिकन संघ पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. तसेच या स्पर्धेत अंतिम सामना वगळता सर्वच्या सर्व सामने जिंकले होते. त्यामुळे दक्षिण अफ्रिकन संघाला दु:ख वाटणार यात शंका नाही. पण भारतीय चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आणि मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न केला. दक्षिण अफ्रिकन खेळाडूंनीही भारतीय चाहत्यांच्या कृतीला दाद दिली.
Indian fans went to cheer the disheartened South African team and chanted ‘we love you, South Africa’. 👏❤️pic.twitter.com/ojpVymt0IF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 1, 2024
भारतीय चाहत्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली सकारात्मक पोस्ट पडल्या आहेत. तसेच अनेकांनी या कृतीचं कौतुक केलं आहे. काही जणांनी दक्षिण अफ्रिकेला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दक्षिण अफ्रिकन संघ आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळताना दिसेल. या स्पर्धेचं जेतेपद दक्षिण अफ्रिकेने एकदा मिळवलं आहे. हा एकमेव आयसीसी पुरस्कार दक्षिण अफ्रिकन संघाकडे आहे.