INDW vs AUSW : दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाकडे 157 धावांची मजबूत आघाडी, विजयाच्या आशा वाढल्या
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामध्ये कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचा दुसरा दिवस टीम इंडियाने गाजवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ बॅकफूटवर गेला आहे. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 157 धावांची आघाडी घेतली आहे. अजून या धावसंख्येत तिसऱ्या दिवशी भर पडणार आहे.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ कसोटी सामना खेळत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली आहे. दुसऱ्या दिवसाअखेर भारातने 157 धावांची मजबूत आघाडी मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पण पूजा वस्त्राकार आणि स्नेह राणाच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 219 थांबला. त्यानंतर भारतीय संघाने तोडीस तोड उत्तर देत दुसऱ्या दिवसअखेर 7 गडी बाद 376 धावा केल्या. यामुळे टीम इंडियाकडे 157 धावांची आघाडी असून यात आणखी काही धावांची भर पडणार आहे. त्यामुळे ही आघाडी मोडून भारतीय संघाला विजयी धावांचं आव्हान देणं ऑस्ट्रेलियाला कठीण जाणार आहे.
भारताचा डाव
शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना ही जोडी मैदानात उतरली होती. शफाली वर्माने आक्रमक खेळी करत 40 धावा केल्या. पण जेस जोनासेनच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतली. त्यानंतर स्नेह राणा एशले गार्डनरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. तिने 57 चेंडू खेळत फक्त 9 धावा केल्या. पण एका बाजून स्मृती मंधानाने चांगली झुंज दिली. तिने 106 चेंडूत 74 धावा केल्या. पण धावचीत होत तंबूत परतली. रिचा घोष आणि हरमनप्रीत कौर यांनी डाव सावरला. रिचा घोषने 52 आणि जेमिमा रॉड्रिक्सने 73 धावा केल्या.
हरमनप्रीत कौर हीला आपलं खातंही खोलता आलं नाही. तर यास्तिका भाटिया अवघ्या एका धावेवर तंबूत परतली. मात्र तळाच्या दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकारने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. दुसऱ्या दिवसअखेर दीप्ती शर्मा नाबाद 70 आणि पूजा वस्त्राकार नाबाद 33 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडून एशले गार्डनरने 4, तर किम गार्थ आणि जेस जोनासेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, राजेश्वरी गायकवाड
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मूनी, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), एनाबेल सुथरलँड, एशले गार्डनर, जेस जोनासेन, एलाना किंग, किम गर्थ, लॉरेन चीटल