INDW vs BANW : भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेत पुन्हा निघाला पंचांचा मुद्दा! हरमनप्रीत कौर आणि निगर सुल्ताना म्हणाली…
भारतीय महिला संघ पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरु असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी मागच्या मालिकेत घडलेल्या प्रकरणावर भाष्य केलं. पंचांच्या वादावर नेमकं आता काय मत आहे ते दोघांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं.
भारतीय महिला संघ पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडिया ही मालिका खेळत आहे. बांगलादेशमधील सिल्हेट आंतरराष्ट्रीय मैदानावर पहिला सामना सुरु आहे. पण या मालिकेपूर्वी या दोन्ही संघात एक वाद उकरून काढण्यात आला आहे. मागच्या दौऱ्यावेळी हरमनप्रीत कौर आणि पंचांचा वाद झाला होता. हरमनप्रीत कौरने पंचांशी हुज्जत घातली होती. त्यामुळे तिचं दोन सामन्यांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. आता पुन्हा दोन्ही मालिकेसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या वादाबात बांगलादेशची कर्णधार निगर सुल्तानाला विचारलं असता म्हणाली, “मला या वादाबाबत जास्त काही माहिती नाही. मागे काय घडलं याचा विचार कोणीही करत नाही.” निगरने पुढे भारतीय संघाचं कौतुक करत म्हणाली, “टी20 मालिकेतून बांगलादेशचा संघ वुमन्स वर्ल्डकपची पायाभरणी करेल. कारण भारताचा हाच संघ वर्ल्डकपमध्ये असणार आहे.”
“खरं सांगायचं तर या वादाबाबत मला काही फारसं माहिती नाही. पण जे काही घडलं ते घडलं. आता त्याचा विचार करण्यात अर्थ नाही.” असं निगरने क्रिकबझशी बोलताना सांगितलं. “हे ऐकायला बरं वाटलं त्यांना आम्ही परिपक्व संघ वाटतो. ते आम्हाला कमी लेखत नाही हे यातून दिसतं. आण्ही एक संधी म्हणून याकडे पाहात आहोत. कारण भारत हा एक चांगला संघ आहे. बहुतांश हाच संघ वर्ल्डकपमध्ये खेळेल. दोन्ही संघांना या माध्यमातून तयारी करता येईल.”, असंही ती पुढे म्हणाली.
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, “भुतकाळातल्या त्या गोष्टी आता संपल्या आहेत. आता नवीन ठिकाण आहे, नवीन मालिका आहे. आम्ही इथे चांगलं क्रिकेट खेळायला आलो आहोत. बांगलादेशमध्ये यंदाचा महिला टी20 वर्ल्डकप आहे. खरं तर आमच्यासाठी ही संधी आहे. इथे खेळून इथल्या परिस्थितीचा अंदाज घेता येईल. आम्ही जेव्हा कधी येथे येतो तेव्हा चांगलं खेळण्याचा प्रयत्न असतो. इथली खेळपट्टी चेंडू खाली राहणारी आणि स्लो आहे. त्यामुळेच वर्ल्डकपपूर्वी आम्हाला येथे खेळायचं होतं. आम्ही परिस्थितीनुसार आम्हाला स्वत:ला सावरून घेऊ.”