INDW vs ENGW : इंग्लंडने तीन सामन्यांची टी20 मालिका 2-0 ने खिशात घातली, भारतीय बॅटर्स पुन्हा एकदा फेल
भारत आणि इंग्लंड महिला संघात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. ही मालिका इंग्लंडने 2-0 ने खिशात घातली. दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया कमबॅक करेल अशी आशा होती. पण इंग्लंडने डोकं वर काढूच दिलं नाही. तसेच हा सामन्यासह मालिका सहज जिंकली.
मुंबई : इंग्लडने महिला संघांनी टी20 मालिकेवर 2-0 ने वर्चस्व गाजवलं. टीम इंडियाचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव करत तीन सामन्यांची टी20 मालिका खिशात घातली आहे. टीम इंडियाकडून कमबॅकची भारतीय क्रीडारसिकांना आशा होती. पण महिला संघाने भ्रमनिरास केला. पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने नांगी टाकली. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर घरच्या मैदानावर पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पहिल्या षटकापासूनच इंग्लंडचा संघ भारतीय महिला संघावर हावी झाला होता. अवघ्या 16.2 षटाकत संपूर्ण भारतीय संघ अवघ्या 80 धावांवर गुंडाळला. त्यामुळे हा सामना वाचवणं तसं कठीण होतं. त्यामुळे मालिका हातून गेली हे जवळपास स्पष्ट झालं होतं. रेणुका सिंगने टीम इंडियाला कमबॅक करण्यासाठी प्रयत्न केला. सोफिया डंकले आणि डॅनी व्याट हीला स्वस्तात बाद केलं. पण एलिस कॅप्से आणि नॅट सायवर ब्रंट जोडीने विजयी धावांकडे कूच करून दिली. नॅट 16 धावांवर असताना बाद झाली खरी पण तिथपर्यंत इंग्लंडचा विजय सोपा झाला होता. त्यामुळे रविवारी होणारा तिसरा केवळ औपचारिकता असणार आहे.
दुसऱ्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्स सोडली तर एकही बॅटर चांगली कामगिरी करू शकली नाही. खरं तर इंग्लंडच्या गोलंदाजांनी डोकं वर काढूच दिलं नाही असंच म्हणावं लागेल. 8 बॅटर दुहेरी धावाही गाठू शकले नाहीत. त्यापैकी दोघींना भोपळा फोडता आला नाही. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांचा हिरमोड झाला. एकीकडे डब्ल्यूपीएल ऑक्शनमध्ये खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. दुसरीकडे, टीम इंडियाची अशी खेळी पाहून क्रीडारसिक नाराज झाले आहेत.
इंग्लंडकडून गोलंदाजीसाठी सहा गोलंदाजांनी गडी बाद केले. चार्ली डीनने 2, लॉरेन बेलने 2, सोफिया एक्सलस्टोनने 2, साराह ग्लेनने 2, नॅट सायरवर ब्रंटने 1 आणि फ्रेया केम्प हीने 1 गडी बाद केला. 81 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 6 गडी गमवले आणि विजयी आव्हान गाठलं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, पूजा वस्त्राकर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक
इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफिया डंकले, डॅनिएल व्याट, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हेथर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेलसोफिया डंकले, डॅनिएल व्याट, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हेथर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल