IPL | आयपीएल पर्पल कॅप विनर बॉलरची तडकाफडकी निवृत्ती
पर्पल कॅप विजेता ठरलेल्या या गोलंदाजाने आयपीएलच्या 16 व्या मोसमाआधी ट्विटद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे.
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. या पर्वासाठी सर्व 10 संघ सज्ज आहेत. चेन्नईने सरावाला सुरुवातही केली आहे. मात्र त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमध्ये पर्पल कॅप विनर ठरलेल्या गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. हा गोलंदाज गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटपासून दूर होता. या गोलंदाजाने आपल्या टीमचे संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. या गोलंदाजाच्या वेगामुळे फलंदाजांमध्ये दहशतीचं वातावरण असायचं.
पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज आणि आयपीएलच्या पहिल्या मोसमात पर्पल कॅप जिंकलेला सोहेल तनवीर याने क्रिकेटला अलविदा केला आहे. सोहेलने ट्विट करत आपल्या निवृत्तीची माहिती दिली आहे.
ट्विटमध्ये काय म्हटलंय?
सोहेलने 6 मार्च रोजी क्रिकेटला बायबाय केलं. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निवृत्ती घेतोय. मात्र देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिन. मला ही संधी दिली यासाठी मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आभारी आहे.”, असं ट्विट सोहेलने केलं.
सोहेल तनवीरचा क्रिकेटला रामराम
Announcement: I am retiring from all formats of international cricket and will continue to play domestic and franchise cricket going forward. Thank you to @TheRealPCB for giving me the opportunity to play for my country ??
— Sohail Tanveer (@sohailmalik614) March 6, 2023
पर्पल कॅप विजेता ठरलेल्या या गोलंदाजाने आयपीएलच्या 16 व्या मोसमाआधी ट्विटद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे.
आयपीएल स्पर्धेचा पहिला मोसम 2008 मध्ये खेळवण्यात आला होता. या पहिल्या मोसमात सोहेलने धमाका केला होता. सोहलने 2008 मध्ये 11 सामन्यात सर्वाधिक 22 विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकण्याचा बहुमान मिळवला होता. सोहेलने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 14 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. सोहेल त्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता.
राजस्थान रॉयल्स पहिल्या मोसमात चॅम्पियन ठरली होती. राजस्थानला चॅम्पियन करण्यात सोहेलचं विशेष योगदान राहिलं होतं. पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी हाच पहिला हंगाम शेवटचा ठरला. त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील ताणल्या गेलेल्या राजकीय परिस्थितीमुळे पाक खेळाडूंना आयपीएलसाठी रेड सिग्नल दाखवण्यात आला. तेव्हापासून पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे कायमचे बंद झाले.
सोहेलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
सोहेलने 2 कसोटी, 62 वनडे आणि 57 टी 20 सामन्यात अनुक्रमे 5, 71 आणि 54 विकेट्स घेतल्या.
या स्पर्धेत खेळणार
दरम्यान सोहेल आता लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेला कतारमधील दोह्यातील एशियन टाउन क्रिकेट स्टेडियमध्ये 10 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सोहेल एशिया लायंसंकडून खेळणार आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना हा इंडिया महाराजा विरुद्ध एशिया लायंस यांच्यात खेळवण्यात येणार आहे.