IPL 2021 : कोरोनापुढे आयपीएल हरलं पण या खेळाडूंनी क्रिकेट रसिकांच्या हृदयावर राज्य केलं!
आयपीएल सुरु असताना विविध फ्रेंचायजीच्या खेळाडूंनी आपल्या बहारदार खेळाने क्रिकेट रसिकांच्या हृदयावर राज्य केलं. आपण पाहूयात कोणकोणत्या खेळाडूंचा कसा परफॉर्मन्स राहिला...! (IPL 2021 Kieron Pollard Chetan Sakariya prithvi Shaw Shikhar Dhawan HarshaL Patel Ravidra jadeja Won Heart Cricket Fans)
मुंबई : देशभर कोरोनाचा उद्रेक होत असताना आता आयपीएललाही कोरोनाने गाठल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला. सुरु असलेला आयपीएल 2021 चा (IPL 2021) 14 वा हंगाम स्थगित करण्यात आला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची घोषणा केली. या स्पर्धेत एकूण एकूण 29 सामने खेळले गेले. उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. कोरोनाने आयपीएलला हरवलं. परंतु आयपीएल सुरु असताना विविध फ्रेंचायजीच्या खेळाडूंनी आपल्या बहारदार खेळाने क्रिकेट रसिकांच्या हृदयावर राज्य केलं. आपण पाहूयात कोणकोणत्या खेळाडूंचा कसा परफॉर्मन्स राहिला…! (IPL 2021 Kieron Pollard Chetan Sakariya prithvi Shaw Shikhar Dhawan HarshaL Patel Ravidra jadeja Won Heart Cricket Fans)
हर्षल पटेल
आयपीएलच्या 14 व्या पर्वात क्रिकेट रसिकांच्या मनावर सगळ्यात जास्त राज्य केलं ते बंगळुरुचा नवा हिरा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने… बंगळुरुकडून खेळताना आयपीएल स्थगित होण्यापूर्वी त्याने तब्बल 17 विकेट्स घेतल्या. आयपीएल सुरु झाल्यापासून त्याच्याकडे पर्पल कॅप होती. पॉवर प्ले मध्ये तो प्रतिस्पर्धी संघांच्या विकेट्स घ्यायच्या. तसंच डेथ ओव्हर्समध्येही तो चांगला बोलिंग करायचा. रवींद्र जाडेजाचा अपवाद वगळता हर्षलने उत्तम बोलिंग केली. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात हर्षल पटेलच्या एका ओव्हरमध्ये रवींद्र जाडेजाने 37 धावा झोडल्या.
चेतन साकरिया
चेतन साकरियाने यंदाच्या साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पदार्पणातच त्याने चमकदार कामगिरी केली. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने 3 फलंदाजांना बाद करुन धडाकेबाज एन्ट्री केली. राजस्थानने खेळलेल्या सहा सामन्यांत त्याने उत्तम गोलंदाजी केली. राजस्थान रॉयल्सने फेब्रुवारीत झालेल्या लिलावात 1.20 कोटी रुपयांत चेतनला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं होतं.
चेतन सौराष्ट्रच्या वतीने देशांतर्गत क्रिकेट खेळतो. अलीकडेच त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शन केलं होतं. यात त्याने पाच सामन्यांमध्ये 12 विकेट घेतल्या होत्या आणि त्याचा इकोनॉमी 5 च्या आसपास होता. गेल्या वर्षी सौराष्ट्रला रणजी करंडक स्पर्धेत विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 23 वर्षीय सकारियाने मोठ्या संघर्षासह त्याचं क्रिकेट करिअर बनवलं आहे.
पृथ्वी शॉ आणि शिखर धवन
भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन याने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आपल्या बॅटची जादू दाखवली. त्याने 7 सामन्यांत 380 धावा ठोकल्या. स्पर्धा रद्द होण्याअगोदर ऑरेंज कॅप त्याच्याकडेच होती. याशिवाय स्पर्धेत सर्वाधिक चौकार ठोकण्याचा मानही त्याने मिळवला. त्याच्या नावावर 43 चौकार आहेत.
शिखर धवनच्या साथीने दिल्लीची धमाकेदार ओपनिंग करण्यात पृथ्वी शॉ चा देखईल सिंहाचा वाचा राहिला. अनुभव कमी असला म्हणून काय झालं, आपल्या क्षमतेला प्रतिभेची जोड दिली की सर्वोत्तम कामगिरी करता येते, हे यंदाच्या मोसमात पृथ्वीने दाखवून दिलं. त्याने कोलकात्याविरुद्ध केवळ 41 चेंडूत 82 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याची ही खेळी क्रिकेट रसिक प्रेक्षक पुढची अनेक वर्ष विसरणार नाहीत.
रवींद्र जाडेजा
दुखापतीतून सावरल्यानंतर रवींद्र जाडेजाने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली. आपल्या बॅटिंग, फिल्डिंग आणि बोलिंगच्या जोरावर त्याने प्रतिस्पर्धी संघाला आपल्या तालावर नाचवलं. जाडेजाने स्पर्धेत आपल्या बोलिंग आणि बॅटिंगबरोबर फिल्डिंग विशेषत: रन आऊटमध्ये चमकदार कामगिरी केली. त्याची बंगळुरुविरुद्धची खेळी तर पुढच्या कैक वर्षे सर्वांच्या स्मरणात राहणारी आहे. त्याने पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलच्या एकाच ओव्हरमध्ये पाच षटकारांच्या मदतीने 37 धावा झोडल्या. याच मॅचमध्ये त्याने 3 विकेट्सही घेतल्या होत्या.
कायरन पोलार्ड
आयपीएलच्या 14 पर्वाच्या सुरुवातीला बिग हिटर कायरन पोलार्डची बॅट बोलत नव्हती. पण चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याने अद्वितीय कामगिरी केली. मुंबईला जिंकण्यासाठी पर्वताएवढं मोठं आव्हान असताना पोलार्डने खेळपट्टीवर पाय रोवून शेवटच्या बॉलवर मुंबईला विजय मिळवून दिला. त्याने केवळ 34 चेंडूमध्ये नाबाद 87 धावांची धमाकेदार खेळी खेळली. या खेळीत त्याने 8 गगनचुंबी षटकार लागवले. यातील 3 षटकार 90 मीटरपेक्षा अधिक लांबीचे होते. पोलार्डची ही खेळी क्रिकेट फॅन्स विसरुच शकणार नाही.
(IPL 2021 Kieron Pollard Chetan Sakariya prithvi Shaw Shikhar Dhawan HarshaL Patel Ravidra jadeja Won Heart Cricket Fans)
हे ही वाचा :
IPL Suspend : कोरोनाचा उद्रेक, BCCI ची मोठी घोषणा, आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित
IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी येऊ देणार की नाही?, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं स्पष्टीकरण
PHOTO | जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा कोरोनाच्या कचाट्यात, ‘इतके’ खेळाडू बाधित