मुंबई: मागच्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या IPL 2022 स्पर्धेचा उद्या शेवट होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi Stadium) फायनल मॅच होणार आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन संघांमध्ये फायनल होणार आहे. दोन संघांपैकी एका टीमने यंदाच्या सीजनमध्ये डेब्यु केलाय तर दुसऱ्या टीमकडे फायनल जिंकण्याचा अनुभव आहे. आता आयपीएलला नवीन चॅम्पियन मिळणार की, जुनी टीमच आयपीएल जिंकणार, ते उद्या समजेल. उद्या फायनल सामन्याआधी IPL 2022 चा दिमाखदार क्लोजिंग सोहळा होईल. यामध्ये बॉलिवूडचे दिग्गज कलाकार रंग भरतील.
आयपीएल क्लोजिंग सेरेमनीचं शेवटचं आयोजन 2018 मध्ये झालं होतं. फायनल सुरु होण्याच्या 50 मिनिटं आधी क्लोजिंग सेरेमनीच आयोजन होईल. ब्रॉडकास्टरने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी क्लोजिंग सेरेमनीचा कार्यक्रम सुरु होईल. गुजरात आणि राजस्थानमध्ये फायनलचा महामुकाबला रात्री 8 वाजता सुरु होईल.
आयपीएलच्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये जे कलाकार आपली कला सादर करणार आहेत, त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. टि्वटरवर त्यांनी आपल्या परफॉर्मन्सची माहिती दिली आहे. एआर रेहमान यांनी परफॉर्मन्सची वेळ आणि कुठे हा कार्यक्रम पाहता येईल, त्याची टि्वटरवर माहिती दिलीय.
Join me on a journey of the 8 decades of Indian Cricket that have redefined India at 75 as we pay the largest salute. pic.twitter.com/bhHAHPPyAm
— A.R.Rahman (@arrahman) May 27, 2022
45 मिनिट चालणाऱ्या या क्लोजिंग सेरेमनीची जबाबदारी BCCI ने एका एजन्सीवर सोपवली आहे. क्लोजिंग सेरेमनीमध्ये भारतीय क्रिकेटचा प्रवास सादर केला जाईल. याचवेळी आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाचा ट्रेलर लाँच होईल. पहिल्यांदाच क्रिकेट मॅच दरम्यान एका चित्रपटाचा ट्रेलर लाँच होईल. आयपीएल फायनल पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्टेडियममध्ये उपस्थित राहू शकतात, अशी चर्चा आहे.