मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) यंदाचा 15 वा सीजन आहे. या मोसमात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ खूपच खराब फॉर्ममध्ये आहे. पाच वेळचा चॅम्पियन संघ अजूनपर्यंत एकही मॅच जिंकू शकलेला नाही. सलग सहा सामन्यात पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या या कामगिरीनंतर एक मोठा निर्णय घेणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईची टीम संघात अशा एका गोलंदाजाला घेण्याचा विचार करतेय, जो सध्या IPL मध्ये कॉमेंट्री करतोय. धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) हा लवकरच मुंबई इंडियन्सच्या स्क्वाड मध्ये दाखल होऊ शकतो. धवल कुलकर्णी मागचे दोन सीजन मुंबई इंडियन्सचा भाग होता. पण यंदाच्या सीजनसाठी त्याला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं नाही. धवलवर मुंबईच नाही, कुठल्याही संघाने बोली लावली नाही.
धवल कुलकर्णी आयपीएल 2022 मध्ये खेळताना दिसू शकतो. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा धवलला संघात घेण्याबद्दल गंभीर आहे. रोहितला धवल कुलकर्णी टीम मध्ये हवा आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. धवलला संघात घ्यावं, अशी रोहितची इच्छा आहे. यामुळे मुंबईच्या गोलंदाजीला बळकटी येईल. धवल मूळचा मुंबईचा आहे. इथे आणि पुण्यात कशी गोलंदाजी करायची? हे त्याला चांगलं ठाऊक आहे.
मुंबईने आतापर्यंत सहा सामने गमावलेत. त्याचं मुख्य कारण आहे, गोलंदाजी. इतर संघांच्या तुलनेत मुंबईची गोलंदाजी खूपच कमकुवत आहे. जसप्रीत बुमराह सोडल्यास मुंबईचा दुसरा एकही गोलंदाज चांगली कामगिरी करु शकलेला नाही. बासिल थंपीचा प्रति षटक इकॉनमी रेट 9.50 आहे. टायमल मिल्स 11.17 च्या इकॉनमी रेटने धावा लुटवतोय. डॅनियल सॅम्सचा प्रति षटक इकॉनमी रेट 13 आहे. एकवेळ मुंबईची गोलंदाजी मजबूत मानली जायची. पण आता तेच गोलंदाज संघर्ष करत आहेत.
धवल कुलकर्णीकडे आयपीएलचा मोठा अनुभव आहे. त्याने 92 सामन्यात 86 विकेट घेतलेत. तो राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स या संघांकडून खेळला आहे. मागच्या दोन वर्षात त्याला फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या सीजनमध्ये त्याच्यावर कोणी बोली लावली नाही. म्हणून त्याने कॉमेंट्रीमध्ये नवी इनिंग सुरु केली. पण आता धवल कुलकर्णी मैदानावर खेळताना दिसू शकतो. धवल दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करु शकतो.