कोलकाता: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने विजयी शुभारंभ केला आहे. चेन्नई सुपर किंग्सला त्यांनी सहा विकेट राखून सहज पराभूत (KKR vs CSK) केलं. एमएस धोनीने (MS dhoni) या सामन्यात चमकदार खेळ दाखवला. आपल्यात अजूनही क्रिकेट शिल्लक असल्याचं त्याने दाखवून दिलं. धोनीने टीकाकारांना आपल्या फलंदाजीने उत्तर दिलं. पण त्याचा उपयोग झाला नाही. कोलकाताच्या फलंदाजांनी 132 धावांचे लक्ष्य 18.3 षटकात आरामात पार केलं. केकेआरकडून मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 44 धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि शेल्डन जॅक्सनच्या जोडीने केकेआरच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. चेन्नई आजच्या सामन्यात आपल्या तीन प्रमुख खेळाडू शिवाय उतरला होता. या तिघांची उणीव चेन्नईला जाणवली. दीपक चाहर, मोइन अली आणि ड्वेन प्रिटोरियस हे तीन खेळाडू आजच्या सामन्यात नव्हते.
धोनीने लाज वाचवली
वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर मागच्या काही सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना संघ जिंकले आहेत. आजच्या सामन्यातही तेच दिसलं, केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. चेन्नई इतकी कमी धावसंख्या करेल अशी अपेक्षा नव्हती. खरंतर महेंद्रसिंह धोनीने चेन्नईची लाज वाचवली. अवघ्या 61 धावात चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यावेळी धोनीने रवींद्र जाडेजासोबत संयमी फलंदाजी केली व अखेरच्या काही षटकांमध्ये आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. त्यामुळे चेन्नईला 130 धावसंख्येपर्यंत पोहोचता आले.
A ZORDAAR performance to get off the mark in #IPL2022! ?#KKR #KKRHaiTaiyaar #CSKvKKR #GalaxyOfKnights #কেকেআর pic.twitter.com/aSdAhtqszW
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 26, 2022
जाडेजाची चूक महागात पडली
केकेआरच्या गोलंदाजांनी आज सुरुवातीपासून चेन्नईवर वचक ठेवला. त्यांनी टिच्चून गोलंदाजी केली. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. वेगवान गोलंदाज उमेश यादवने सीएसकेच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडलं. अंबाती रायडू जाडेजाच्या चुकीमूळे धावबाद झाला, तर दमदार फलंदाजी करणाऱ्या रॉबिन उथाप्पाची शेल्डन जॅक्सनने शानदार स्टम्पिंग केली. त्यामुळे चेन्नईचा डाव अडचणीत आला. कॅप्टन रवींद्र जाडेजा दबावाखाली असल्याचं जाणवत होतं. पंधराव्या षटकापर्यंत धावा करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघर्ष सुरु होता. कोलकात्याच्या विजयाचे श्रेय गोलंदाजांना जाते. गोलंदाजांमुळे आजचा विजय शक्य झाला.