नवी दिल्ली: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (IPL) चार दिवसांवर आलेली असताना दिल्ली कॅपिटल्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया (Anrich Nortje) दुखापतीमुळे खेळणार नसल्याची बातमी आली होती. पण आता एनरिक नॉर्खिया दुखापतीमधून सावरला असून तो आयपीएल 2022 स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. एनरिक नॉर्खिया फक्त पहिले दोन सामने खेळणार नाहीय. तिसऱ्या सामन्यापासून दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi capitals) उपलब्ध असेल. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 7 एप्रिलला होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात नॉर्खिया खेळताना दिसेल. दुखापतीमुळे एनरिक नॉर्खिया टी 20 वर्ल्ड कपनंतर मैदानावर उतरलेला नाही. भारताविरुद्धची मालिका आणि टी 20 वर्ल्ड कप लक्षात घेता, दक्षिण आफ्रिकेची मेडीकल टीम त्याच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करायला तयार नव्हती.
दिल्लीने त्याच्यासाठी किती कोटी मोजले?
सध्या सुरु असलेल्या बांग्लादेश विरुद्धच्या मालिकेतही त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. एनरिक नॉर्खिया दुखापतीमधून जवळपास सावरला आहे. तो मुंबईत पोहोचला असून क्वारंटाइन झाला आहे. सामन्यासाठी फिट जाहीर होण्याआधी एनरिक नॉर्खिया हलका सराव करेल. दिल्ली कॅपिटल्सने तब्बल 6.5 कोटी रुपये मोजून त्याला रिटेन केलं होतं. गोलंदाजीमध्ये त्याच्यावर प्रामुख्याने भिस्त असेल.
कधीपासून गोलंदाजी केलेली नाही
दुखापतीचं स्वरुप थोडं वेगळ असल्यामुळे तो खेळणार की, नाही याबद्दल थोडा संशय होता. भारताविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठीही त्याचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. न्यूझीलंड आणि बांग्लादेश विरुद्धच्या मालिकेतही तो खेळला नव्हता. नोव्हेंबरपासून एनरिक नॉर्खियाने गोलंदाजी केलेली नाही. आपला स्टार खेळाडू कधी उपलब्ध होणार? याची दिल्ली कॅपिटल्सलाही उत्सुक्ता होती.
शेवटचा कधी खेळला होता
दक्षिण आफ्रिकेच्या मेडीकल टीमने नॉर्खियाला क्लियरन्स दिला आहे. डीसीच्या मेडीकल स्टाफनेही त्याला क्लियरन्स दिला, तर तो मैदानावर खेळू शकतो. नॉर्खिय याआधी टी 20 वर्ल्डकपमध्ये शेवटचा खेळला होता. आयपीएलमध्ये 27 मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या सामन्याने दिल्ली कॅपिटल्सचे अभियान सुरु होणार आहे. त्यानंतर दोन एप्रिलला गुजरात टायटन्स विरुद्ध सामना होणार आहे.
मागच्या सीजनमध्ये किती विकेट घेतल्या?
नॉर्खिया हे दोन्ही सामने खेळणार नाही. नॉर्खियाने मागच्या सीजनमध्ये आठ सामन्यात 12 विकेट घेतल्या होत्या. 2020 मध्ये या वेगवान गोलंदाजाने 16 सामन्यात 22 विकेट घेतल्या होत्या.