मुंबई: मुंबई इंडियन्सचा काल कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) मोठा पराभव केला. पॅट कमिन्सच्या (Pat cummins) वादळी खेळीने सर्व चित्रच बदलून टाकलं. मुंबई इंडियन्सच्या डॅनियल सॅम्सने काल इंडियन प्रीमियर लगीच्या इतिहासातील एक महागड षटक टाकलं. पॅट कमिन्सने काल सॅम्सच्या गोलंदाची वाट लावली. तो टाकत असलेल्या 16 व्या षटकात कमिन्सने 35 धावा लुटल्या. यात चार सिक्स आणि दोन षटकार होते. पॅट कमिन्सने जो हल्लाबोल केला, त्यामुळे केकेआरने 16 व्या षटकातच 162 धावा करुन सामना जिंकला. पाच विकेट आणि 24 चेंडू राखून कोलकाताने विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यंदाच्या सीजनमधली पराभवाची हॅट्ट्रिक केली. हा पराभव मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या नक्कीच जिव्हार लागला. सोशल मीडियावर काही युजर्सनी डॅनियल सॅमच्या पोस्टवर इन्स्टाग्रामवर शिवीगाळ करणारे मेसेज पोस्ट केले.
डॅनियल सॅम्सने तीन षटकात 50 धावा मोजल्या. पॅट कमिन्सने 14 चेंडूत अर्धशतक झळकावून वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी काल बरोबरी केली. “काही षटकात सामना ज्या पद्धतीने बदलला, ते पाहात हा पराभव पचवणं कठीण आहे. आम्हाला अजून बरीच मेहनत करायची आहे” असं रोहितने सामना संपल्यानंतर सांगितलं.
“मलाच माझ्या खेळीचं आश्चर्य वाटतय. मी अशी फलंदाजी करु शकलो याचा आनंद आहे. मोसमातील पहिल्या सामन्यात अशी कामगिरी करु शकलो. याचं समाधान आहे” असं पॅट कमिन्स या खेळीनंतर म्हणाला.
मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. सध्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ शेवटून दुसऱ्या म्हणजे नवव्या स्थानावर आहे. काल टायमल मिल्सने 14 व्या ओव्हरमध्ये अँड्रे रसेलचा विकेट काढला. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या सामना जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. केकेआरची धावसंख्या त्यावेळी पाच बाद 101 होती.
रोहित शर्माची ही निराशा, चिडचिड काल दिसून आली. एरवी रोहित शर्मा शांत-संयमी दिसतो. पण काल मॅच नंतर प्रेझेटेशनच्या कार्यक्रमात त्याची अस्वस्थतता दिसून आली. पुण्याच्या MCA स्टेडियमवर साऊंड हाताळणाऱ्या टेक्निशियनवर रोहित शर्मा चिडला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. स्टेडियमवर प्रेक्षकांचा गोंगाट असलेल्या सूत्रसंचालक काय म्हणतोय, ते रोहितला नीट ऐकू येत नव्हतं. त्याने टेक्निशियनला आवाज वाढवायला सांगितला. जेणेकरुन सूत्रसंचालक काय बोलतोय, ते समजेल. ‘आवाज वाढव यार त्याचा’ असं रोहित कॅमेऱ्यासमोर बोलला. त्यावेळी तो वैतागल्याचे भाव स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर होते.