मुंबई: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा सुरु व्हायला आता फक्त दोन दिवसांचा अवधी उरला आहे. 15 व्या सीजनचं जेतेपद मिळवण्यासाठी सर्वच संघ कसून तयारी करत आहेत. लखनौ सुपर जायंट्स (Lucknow super giants) यंदाच्या मोसमातील नवीन संघ आहे. लखनौने सुद्धा आपली छाप उमटवण्यासाठी उत्तम संघ बांधणी केली आहे. केएल राहुल (KL Rahul) लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन आहे, तर गौतग गंभीर या टीमचा मार्गदर्शक आहे. आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधी गौतम गंभीरने केएल राहुलला एक सूचक सल्ला दिला आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील कॅप्टनशिपमुळे उद्या भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल, याची खात्री नाही, असा गंभीरने राहुलला सल्ला दिला आहे. कॅप्टन असला, तरी एक फलंदाज म्हणून तुझी संघाला जास्त गरज आहे, हे सुद्धा गौतम गंभीर यांनी केएल राहुलला स्पष्ट केलं.
LSG चा कॅप्टन केएल राहुल सध्या भारतीय संघाचा सर्व फॉर्मेटमधील उपकर्णधार आहे. त्याच्याकडे भविष्यातील भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे सीरीजमध्ये नेतृत्व केले होते. पण या सीरीजमध्ये भारताचा 3-0 असा पराभव झाला होता.
फलंदाज म्हणून जास्त आवश्यक
“कॅप्टनचा टीमचा ध्वजवाहक असतो, त्यामुळे केएल राहुल लखनौ सुपर जायंट्सच मैदानावर आणि बाहेर नेतृत्व करणार आहे. संघाचा कॅप्टन असला, तरी एक फलंदाज म्हणून केएल राहुल माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. हा फरक मी तुमच्या लक्षात आणून दिला असेल, अशी अपेक्षा करतो” असं गंभीर म्हणाला. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.
केएल राहुलने धोके पत्करावेत
गौतम गंभीर यांच्यानुसार केएल राहुलने बिनधास्तपणे कॅप्टनशिप करावी. “कुठल्याही कर्णधाराने धोके पत्करायला शिकलं पाहिजे. राहुलनेही धोका पत्करावेत अशीच माझी इच्छा आहे. तुम्ही धोके पत्करणार नाही, तो पर्यंत तुम्हाला तुम्ही यशस्वी होणार की, नाही हे कळणार नाही. क्विंटन डि कॉक विकेटकिपिंग करणार आहे. त्यामुळे केएल राहुल बिनधास्त आणि मुक्तपणे आपल्या फलंदाजी आणि नेतृत्वावर लक्ष केंद्रीत करु शकतो” असं गंभीर म्हणाला.
आयपीएलमध्ये कॅप्टन म्हणून रेकॉर्ड काय?
मागच्या काही सीजनमध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजापैकी केएल राहुल एक आहे. सलग चार सीजनमध्ये त्याने 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 2020 आणि 2021 च्या सीजनमध्ये त्याने 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मागचे दोन सीजन तो पंजाब किंग्सचा कॅप्टन होता. दोन्ही वेळा टीम प्लेऑफ पर्यंत पोहोचू शकली नाही.