IPL 2022 Points Table: गुजरात अव्वल नंबर! मुंबईच्या प्लेऑफच्या आशा धूसर, जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती
इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या 15 व्या हंगामात आतापर्यंत 24 सामने खेळवण्यात आले आहेत. यंदाच्या हंगामात नव्याने सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सने गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या 15 व्या हंगामात आतापर्यंत 24 सामने खेळवण्यात आले आहेत. यंदाच्या हंगामात नव्याने सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सने गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तर आयपीएलमधील आतापर्यंतचे सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)आणि चेन्नई सुपरकिंग्स गुणालिकेत तळाशी आहेत. गुरुवारी स्पर्धेतल्या 24 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) राजस्थान रॉयल्सवर 37 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात गुजरातने राजस्थानला विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य दिले होते. पण राजस्थानला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 155 धावापर्यंतच मजल मारली. या विजयासह गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. स्पर्धेतील गुजरात टायटन्सचा हा पाच सामन्यांपैकी चौथा विजय आहे. राजस्थान रॉयल्सचा हा दुसरा पराभव आहे. राजस्थानने दमदार सुरुवात केली होती. पण ती लय त्यांना कायम राखता आलेली नाही. त्यामुळे सरुवातीपासून पहिल्या क्रमांकावर असलेला राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानी घसरला आहे.
स्पर्धेत मुंबई आणि चेन्नईवगळता इतर संघांचे सामने अटीतटीचे झाले आहेत. गुणतालिकेतही हे दोन संघ सोडून इतर संघांमध्ये चुरस पाहायला मिळतेय. एकट्या गुजरातचे 8 गुण आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघांचे 6 गुण आहेत. केवळ यांच्यात नेट रनरेटचा फरक आहे. हे संघ अनुक्रमे दुसऱ्या ते सहाव्या क्रमांकावर आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ प्रत्येकी चार गुणांसह सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. चेन्नई सुपरकिंगस 2 गुणांसह 9 व्या क्रमांकावर आहेत. तर मुंबई इंडियन्सने अद्याप विजयाचं खातं उघडलेलं नाही.
मुंबईच्या प्लेऑफच्या आशा धूसर
मुंबई इंडियन्स आतापर्यंत तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. अशी कामगिरी अजून दुसऱ्या कुठल्याही संघाला करता आलेली नाही. पण यंदाच्या सीजनमधला मुंबईचा खेळ पाहिला की, हा तोच चॅम्पियन संघ आहे का? असा प्रश्न पडतो. एकापाठोपाठ एक असे पाच सामने मुंबई इंडियन्सन गमावले आहेत. बुधवारी पंजाब किंग्सने (Punjab kings) मुंबई इंडियन्सला 12 धावांनी पराभूत केलं मुंबईला विजयासाठी 199 धावांचं टार्गेट मिळालं होतं. पण मुंबई इंडियन्सला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 186 धावांच करता आल्या. मेगा ऑक्शननंतर मुंबई इंडियन्सने नव्याने संघबांधणी केली आहे. पण अजूनही या संघाची घडी बसलेली नाही. मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही चाचपडतोय. पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्सला सहाव्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर उर्वरित 9 पैकी किमान 8 सामने जिंकावे लागतील. त्यामुळे आता मुंबईच्या प्लेऑफच्या आशा धूसर होऊ लागल्या आहेत.
इतर बातम्या
Purple Cap 2022 : पर्पल कॅप युजवेंद्र चहलकडे, जाणून घ्या कोणते खेळाडू आहेत टॉप 10 मध्ये
IPL 2022, SRH vs KKR : आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद सनराइजर्स सामना, कोलकाता दुसरं स्थान कायम राखणार?