मुंबई : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत (IPL) मंगळवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (Rajasthan Royals vs Royal challengers Banglore) सामना झाला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने हा सामना चार विकेट आणि पाच चेंडू राखून जिंकला. RCB ने राजस्थान रॉयल्सच्या विजयी अभियानाला ब्रेक लावला. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि शाहबाज अहमद आरसीबीच्या विजयाचे नायक ठरले. दोघांनी पराभवाच्या तोंडातून विजय खेचून आणला. अवघ्या सात धावात चार विकेट गेल्या होत्या. सामना नाजूक स्थितीमध्ये असताना कार्तिक-शाहबाज अहमदने विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी 170 धावांचं लक्ष्य दिलं होतं. जोस बटलरच्या 47 चेंडूतील 70 धावांमुळे राजस्थानला 169 धावांपर्यंत पोहोचता आलं. कारण काल RCB च्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन 15 व्या षटकापर्यंत धावगतीला लगाम घातला होता.
कालच्या सामन्यात आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहली विशेष कमाल दाखवू शकला नाही. तो फक्त पाच धावा करुन रनआऊट झाला. विराट कोहलीला राजस्थान रॉयल्सच्या जोडीने खूप सुंदर पद्धतीने धावबाद केलं. यामध्ये कॅप्टन संजू सॅमसनचा सुपरमॅन थ्रो आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या डावात युजवेंद्र चहलने नवव षटक टाकलं.
या ओव्हरमध्ये डेविड विलीने स्क्वेयर लेगच्या दिशेने फटका खेळला. हा फटका फार लांब गेला नाही. नॉन-स्ट्राइक एन्डवर उभा असेलला विराट कोहली धाव घेण्यासाठी पळाला. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन आणि विकेटकिपर संजू सॅमसन चेंडूच्या मागे पळाला. त्याने बॉल उचलून युजवेंद्र चहलकडे फेकला. संजू सॅमसनने डाइव्ह मारुन युजवेंद्र चहलच्या दिशेने बॉल थ्रो केला. चहलने क्षणाचाही विलंब न लावता लगेच स्टम्पवरच्या बेल्स उडवल्या.
इथे रनआऊटचा निर्णय़ घेणं सोप नव्हतं. अपांयरने अनेकवेळा रिप्ले पाहिला. अखेर पंचांनी विराटला रनआऊट दिलं. विराट कोहलीची विकेट RCB साठी मोठा झटका होता. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर चहलने डेविड विलीला क्लीन बोल्ड केलं. झटपट विकेट गेल्यामुळे एकवेळ सुस्थितीत दिसणार आरसीबीचा डाव अडचणीत आला होता. पण दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद संकटमोचक ठरले. त्यांनी सामना जिंकून दिला.