मुंबई: IPL 2022 च्या प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ सहज पोहोचेल असं वाटलं होतं, पण काल पंजाब किंग्सकडून (Punjab kings) पराभूत झाल्यामुळे त्यांचा मार्गही खडतर झाला आहे. पंजाबने काल बँगलोरचा 54 धावांनी पराभव केला. या मोठ्या फरकाने झालेल्या पराभवामुळे RCB चं नेट रनरेटच गणित गडबडलं. आरसीबीसाठी आता शेवटचा सामना करो या मरो आहे. फक्त विजय मिळवून आरसीबीची टीम क्वालिफाय होणार नाही, तर त्यांना (RCB Playoff Scenario) दुसऱ्या संघांच्या निकालावर अवलंबून रहाव लागेल. बँगलोरचा संघ प्लेऑफमध्ये कसा पोहोचू शकतो? हा संघ स्पर्धेबाहेर जाणारा का? असे अनेक प्रश्न आरसीबी चाहत्यांच्या मनात आहेत. या टीमच्या अडचणी वाढल्या आहेत. दोन संघ आरसीबीचं गणित बिघडवू शकतात.
RCB ने काल पंजाब विरुद्धचा सामना जिंकला असता आणि त्यानंतर त्यांनी गुजरात टायटन्सला नमवलं असतं, तर हा संघ टॉप 4 मध्ये राहिला असता. पण पंजाबकडून झालेल्या पराभवामुळे त्यांचा खेळ बिघडला. आता त्यांना गुजरात टायटन्स विरुद्ध कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागेल. आरसीबीने शेवटचा लीग सामना जिंकला, तर त्यांना दिल्ली, पंजाब आणि SRH यांच्या कमीत कमी एक पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. कारण या तीन पैकी एक टीम 16 पॉइंटपर्यंत पोहोचली, तर त्यांचा नेट रनरेट आरसीबी पेक्षा चांगला आहे.
आरसीबीला शेवटचा गुजरात टायटन्स विरुद्धचाही सामना जिंकता आला नाही, तर त्यांना कुठलीही टीम 14 पॉइंटच्या पुढे जाऊ नये, यासाठी प्रार्थना करावी लागेल. सध्या राजस्थान रॉयल्सचे 14 पॉइंट असून त्यांचे दोन सामने बाकी आहेत. कमीत कमी आणखी एकाविजयामुळे त्यांचे 16 पॉइंटस होतील. नेट रनरेटमुळे ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. पंजाब आणि दिल्लीचे 12-12 पॉइंटस आहेत. दोन्ही संघांना 16 पॉइंटस पर्यंत पोहोचण्यासाठी उर्वरित दोन-दोन सामने जिंकावे लागतील. हैदराबादचे 10 पॉइंटस असून त्यांच्या तीन मॅच बाकी आहेत. म्हणजे हे सर्व संघ 16 पॉइंटस पर्यंत पोहोचू शकतात. आरसीबीला आपला शेवटचा सामना जिंकावाच लागेल. त्यांना मोठ्या फरकाने हा विजय मिळवावा लागेल. म्हणजे नेट रनरेट तपासण्याची वेळ आली, तर ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात.