मुंबई: बहुचर्चित आयपीएल स्पर्धा सुरु व्हायला आता फक्त काही दिवसांचाच अवधी उरला आहे. IPL कधी एकदा सुरु होतेय, याची चाहत्यांना उत्सुक्ता आहे. त्यांना आपल्या आवडत्या खेळाडूंना मैदानावर जबरदस्त प्रदर्शन करताना पहायचं आहे. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांना मुंबईच्या टीमकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा ठेवण चुकीचं सुद्धा नाहीय. कारण आयपीएलच्या आतापर्यंत चौदा सीजनमध्ये मुंबईच्या टीमने तब्बल पाच वेळा विजेतेपद मिळवलं आहे. धोनीमुळे CSK ची चर्चा होत असली, तरी त्यांनी चार वेळा विजेतेपद मिळवलय. मुंबईचा संघ जेतेपदामध्ये अव्वल स्थानी आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात चाहत्यांना मुंबईच्या टीमकडून आणखी एका विजेतेपदाची अपेक्षा आहे. इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा 15 वा सीजन आहे. अन्य संघांप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या संघाने सुद्धा नेट्समध्ये जोरदार सराव सुरु केला आहे. मुंबईचे खेळाडू नेटमध्ये घाम गाळतायत. मेहनत घेत आहेत.
कसा असेल मुंबई इंडियन्सचा नवा अंदाज?
मुंबई इंडियन्सची सोशल मीडिया टीम इन्स्टाग्रामवर हे व्हिडिओ सुद्धा पोस्ट करत आहे. मागच्या महिन्यात मेगा ऑक्शन झालं. मुंबईच्या यशस्वी खेळाडूंना दुसऱ्या फ्रेंचायजींनी विकत घेतलं. त्यामुळे यंदा नव्या रुपात, नव्या अंदाजात तुम्हाला मुंबईचा संघ मैदानावर दिसणार आहे.
टिमसाठी मुंबईने का मोजले 8.25 कोटी रुपये?
यंदा मुंबईचा संघ नवीन असून त्यांनी टिम डेविडवर विश्वास दाखवलाय. टिम डेविड हा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी नवीन खेळाडू आहे. सिंगापूरमध्ये जन्मलेल्या टिम डेविडसाठी मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये तब्बल 8.25 कोटी रुपये मोजले. ऑलराऊंडर टिम डेविड बिग हिटर समजला जातो. आपल्या पहिल्याच नेट सेशनमध्येच त्याने आपल्यातल्या स्फोटक फलंदाजाची झलक दाखवून दिली आहे. मुंबई इंडियन्सने त्याच्या आक्रमक फटकेबाजीचा इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे.
199.20 चा स्ट्राइक रेट
पाकिस्तान सुपर लीग आणि बिग बॅश लीग टिम डेविडने गाजवली आहे. त्याचा 199.20 स्ट्राइक रेट आहे. मुंबई इंडियन्ससाठी मधल्याफळीत तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मुंबई इंडियन्सच्या टीममधून खेळताना किमान स्तर असलेला क्रिकेटपटूही कमाल दर्जाचा खेळ दाखवतो. टिम डेविडही त्याच्या लौकीकाला जागून आपला सर्वोत्तम खेळ दाखवेल, अशी अपेक्षा आहे. मुंबई इंडियन्सचा टिमची फटकेबाजी करण्याची क्षमता माहित आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर मोठी किंमत मोजाताना अजिबात हात आखडता घेतला नाही. टिम 89 टी 20 सामने खेळला आहे. 160 च्या आसपास त्याचा स्ट्राइक रेट आहे.