M S Dhoni Ravindra Jadeja यांच्यातील मैत्रीत मिठाचा खडा? त्या ट्विटमुळे खळबळ
महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जडेजा या दोघांमध्ये शनिवारी 20 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यानंतर काहीतरी बिनसल्याचं चित्र दिसून आलं. त्यानंतर जडेजाचं ट्विट व्हायरल झालं आहे.
मुंबई | चेन्नई सुपर किंग्सने शनिवारी 20 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 77 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. चेन्नईने या विजयासह महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात एकूण 12 व्यांदा प्लेऑफमध्ये धडक मारली. चेन्नईने आयपीएल 2023 प्लेऑफमध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरली. चेन्नईच्या या विजयानंतर कॅप्टन धोनी आणि ऑलराउंडर रविंद्र जडेजा या दोघांमध्ये मैदानात झकाझकी झाल्याचं म्हटलं जात आहे. धोनीने जडेजाला झापल्याचा दावा केला जात आहे.
दिल्ली विरुद्धच्या सामन्यानंतर एक व्हीडिओ व्हायरल झालाय. या व्हायरल व्हीडिओत धोनी जडेजाला काहीतरी गंभीर बाब सांगत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे जडेजा धोनीवर नाराज झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या दोघांमध्ये कोणत्या विषयावरुन ही गंभीर चर्चा झाली, हे समजू शकलेलं नाही. मात्र या दोघांमध्ये खटके उडाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या व्हायरल व्हीडिओनंतर जडेजाने एक कोट ट्विट केला आहे. जडेजाच्या या ट्विटचा रोख धोनीकडे असल्याचं म्हटलं जात आहे.
नक्की काय घडलं?
सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू मैदानातून बाहेर जात होते. तेव्हा धोनी आणि जडेजा यांच्यात काहीतरी बोलणं झालं. जडेजाची निराशाजनक बॉलिंग यावरुन धोनीने त्याच्यासोबत चर्चा केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे धोनी जडेजाला समजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. जडेजाने दिल्ली विरुद्ध 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 50 धावा लुटवल्या होत्या. त्यावरुन जडेजा रागावला आहे, असा अंदाज क्रिकेट वर्तुळातून व्यक्त केला जातोय.
जडेजाच्या ट्विटमध्ये काय?
‘कर्माचे फल लवकर मिळो किंवा उशिरा मात्र ते मिळतंच’ असा कोट शेअर करत जडेजाने ‘निश्चितच’ असं कॅप्शन या ट्विटला दिलंय. जडेजाच्या या ट्विटला चाहते धोनीसोबतच्या त्या व्हीडिओशी जोडण्याचा प्रयत्न करतायेत.
जडेजाच्या पत्नीची ट्विवर प्रतिक्रिया
या ट्विटर जडेजाची पत्नी आणि भाजप आमदार रिवाबा जडेजाने कमेंट केली आहे. रिवाबाने ट्विट रिट्विट करत “आपला मार्ग निवडा”, असा सल्ला दिला आहे.
जडेचाचं ट्विट आणि रिवाबाचा सल्ला
Follow your own Path…? https://t.co/SFgmJhUKnw
— Rivaba Ravindrasinh Jadeja (@Rivaba4BJP) May 21, 2023
दरम्यान चेन्नईचा सामना क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यात जिंकणारी टीम थेट अंतिम सामन्यात पोहचेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला फायनलमध्ये पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. क्वालिफायर 1 मध्ये पराभूत होणारी टीम एलिमिनेटरमध्ये विजयी होणाऱ्या संघासोबत खेळेल. आता प्लेऑफसाठी एकूण 3 संघ ठरले आहेत. आरसीबी विरुद्ध जीटी या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतर चौथा संघ कोणता हे निश्चित होईल. त्यामुळे आता प्लेऑफमध्ये क्रिकेट चाहत्यांना रंगतदार सामने पाहायला मिळतील, हे मात्र निश्चित.